लॉस एंजेलिस : प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन याने आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. बहुप्रतिक्षित अवतार-२ आणि अवतार-३ या सिनेमांचे शूटींग पूर्ण झाल्याचे त्याने सांगितले आहे.
२००९साली प्रदर्शित झालेल्या, आणि दशकातील सर्वात मोठा चित्रपट मानल्या जाणाऱ्या अवतार या चित्रपटानंतर त्याच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा चाहत्यांना लागून होती. आता तब्बल ११ वर्षांनंतर या चित्रपटाच्या पुढील दोन भागांचे शूटींग पूर्ण झाल्याची बातमी समोर आली आहे. अर्नाल्ड श्वार्झेनेगर या अभिनेत्याला दिलेल्या मुलाखतीत कॅमेरुनने याबाबत माहिती दिली.
यावर्षी अवतारचे न्यूझीलंडमध्ये शूटींग सुरू होते. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे शूटींग लांबले होते. जूनमध्ये न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर खबरदारीच्या उपायांसह शूटींग सुरू करण्यात आले होते.
कोरोनाचा जसा सगळ्यांना फटका बसला, तसाच आम्हालाही बसला. आम्हाला आमच्या चित्रपटाची रिलीज डेट एका वर्षाने पुढे ढकलावी लागली. सध्या आम्ही न्यूझीलंडमध्ये असून, अवतार-२चे पॅकअप झाले आहे. अवतार-३चे ९५ टक्के शूटींग पूर्ण झाले असून, थोड्या राहिलेल्या शूटींगसाठी आम्ही इथे आहोत असे कॅमेरुन यांनी सांगितले.
अवतार-२ हा १७ डिसेंबर २०२१ला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा २०२२मध्ये प्रदर्शित होईल. तर अवतार-३ची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
हेही वाचा : 'स्पायडरमॅन'च्या नायिकेने रचला इतिहास; ठरली 'एमी' पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण अभिनेत्री