मुंबई - नावापासूनच चर्चेत आलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एप्रिल २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आगळेवेगळे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरून चित्रपट अतिशय धमाल आणि मनोरंजक असणार असा अंदाज बांधण्यात येत आहे. 'कोल एलएलपी'तर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. तर, 'फटमार फिल्म्स एलएलपी'च्या नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी ब्लिंक मोशन पिक्चर्स, अभिषिक्ता इन्फोटेन्मेंट प्रा. लि.आणि कोल फिल्म्सचे संकेत बियाणी, संदेश बियाणी, विकास वोहरा, सुशील कंठेड, रितेश चितलांगिया यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पर्यावरण अभ्यासक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर प्रसाद नामजोशींनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे.
'बास काय भावा, दुसऱ्यांना खाज आहे म्हणूनच आपल्याला माज आहे', निस्ता धूर अशा ओळी, गॉगल लावलेली बिनचेहऱ्याची व्यक्ती, विद्यापीठाची इमारत असे सारे या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे एकूण पोस्टर पाहता चित्रपट धमाल आणि मनोरंजक असेल असे संकेत मिळतात. आता या पोस्टरमुळे चित्रपटाच्या कथानकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, चित्रपट पाहण्यासाठी एप्रिल पर्यंत वाट पहावी लागणार आहे.