अभिनेत्री संस्कृती बालगुडेला नुकतीच तिच्या अभिनयासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाची थाप मिळतेय. ‘८ दोन ७५’ ह्या चित्रपटातल्या तिच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या गेलेल्या ह्या चित्रपटाने संस्कृती बालगुडे फक्त सौंदर्यवतीच नाही आहे, तर ती एक सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री असल्याचेही शिक्कामोर्तब झाले आहे.
इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री, ड्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री अशा चार निरनिराळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये चार पुरस्कारांनी तिला भुषवण्यात आलंय.
या पुरस्करांनी भारावून गेलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणते, “जगभरातल्या आंतरराष्ट्रीय फिल्मफेस्टिवलमध्ये आमच्या सिनेमाला 65 हून अधिक पुरस्कार मिळालेत. गेली दोन वर्ष सिनेमाविश्व थांबलं होतं आणि ते सुरू झाल्यानंतरची ही अत्यंत गोड बातमी आहे. सिनेमाचा विषय वेगळा आहे. आणि त्याचं जे कौतुक होतंय, त्यानेच मी खूप भारावून गेले होते. मला वैयक्तिक पुरस्कारांची अपेक्षा नव्हती. पण सिनेमाचाच फक्त गौरव होत नाही आहे तर मलाही चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप भारी गोष्ट आहे. हे अविश्वसनीय आहे. माझे हे पहिले-वहिले आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.”
संस्कृती पूढे म्हणते, “महिला सशक्तीकरणाला सलाम करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ आलाय. आणि माझी ही सशक्त व्यक्तिरेखा सध्या पुरस्कारांनी गौरवली जातीय. शब्दात व्यक्त करण्या पलीकडची ही अनुभूती आहे. आता माझीच माझ्याकडून अपेक्षा वाढलीय. आता सातत्याने उत्तमोत्तम काम करायला हवीत. ”
हेही वाचा - Radhe Shyam Trailer: प्रभास पूजा हेगडेचा प्रेमासाठी नियतीशी लढा