पालघर/ वसई - उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (२२ सप्टेंबर) उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष निवडीबरोबरच संमेलनाच्या तारखा तसेच संमेलनाचा कार्यक्रमही आता जाहीर केला जाणार आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीनंतर वसईत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे. गेल्यावर्षी त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या साहित्यिक-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे.
आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रानकवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे या दिग्गजांची नावे सहा महिन्यांपासून चर्चेत होती. चपळगावकर वगळता इतर सर्वांनी जाहीरपणे नकार कळवला होता. त्यामुळे मराठवाड्याबाहेरील सर्वमान्य नाव असलेल्या दिब्रिटोंना पसंती देण्यात आली आहे.
आगामी संमेलन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साहित्य सोहळा आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाची काळजी मिटली आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने त्याचेही प्रतिबिंब संमेलनावर उमटण्याची शक्यता आहे.