रांची - हिंदी आणि भोजपुरी चित्रपट व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री अक्षरा सिंह यांच्याशी ईटिव्ही भारतने संवाद साधला. या दरम्यान अक्षराने आपल्या कारकिर्दीतील चढ-उतार मनमोकळेपणाने मांडले. बिहारी असल्याने अनेक ठिकाणी हेटाळणी झाल्याचे अक्षराने सांगितले.
सध्या अक्षरा लोहरदगा येथे एका हिंदी चित्रपट 'युवा' च्या चित्रीकणासाठी आली आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असून खेळ आणि खेळाडूंच्या संघर्षावर हा चित्रपट आधारित आहे. अक्षराने सांगितले की, झारखंडचे वातावरण आणि येथील पर्यटनस्थळे सुंदर आहेत. अशा ठिकाणी चित्रीकरण करताना आनंद होत आहे.
ऐंशी-नव्वदच्या दशकात महिला कलाकारांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला, तो आत्ताच्या कलाकारांना नाही करावा लागत. मात्र, एक महिला कलाकार म्हणून नेहमीच संघर्ष करावा लागतो. मात्र, जर तुम्ही स्वत:साठी एखादा निर्णय घेतला तर तो खंबीरपणे शेवटाला न्या. त्यानंतर लोक आपोआप तुमच्या मागे येतील. बिहारी-भोजपूरी कलाकारांच्या मनात न्यनगंडाची भावना असते. किंबहुना त्यांना तशी वागणूकही दिली जाते. मात्र, स्वत:च खचून गेलात तर लोक आणखी खच्चीकरण करतात. त्यामुळे आपण आपल्यासाठी उभे ठाकले पाहिजे, असे अक्षरा म्हणाली.
तरुणांसाठी परिस्थिती बदलली पाहिजे -
बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यावर जास्त बोलणे अक्षराने टाळले. मात्र, तरुणांसाठी असणाऱ्या शिक्षणाच्या सुविधा आणि मार्गदर्शन यामध्ये नक्कीच बदल झाला पाहिजे, असे अक्षरा म्हणाली.