प्रेक्षक आणि चाहते ज्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामधील प्रमुख कलाकार अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे हे प्रेक्षकांचे आवडते तर आहेत पण हि जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आली आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रोमोज पासूनच प्रेक्षक या जोडीवर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव करतेय. अजिंक्य या मालिकेत इंद्रजितची भूमिका साकारतोय. त्याच्यासोबत साधलेला हा खास संवाद..
१. इंद्रजितची भूमिका तुझ्यासाठी किती आव्हानात्मक आहे?
- या मालिकेत ऍक्टर म्हणून स्वत:ला एक्सप्लोर करायला चांगला चान्स मिळतोय. यापूर्वी मी एका मालिकेत विठ्ठलाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी मला वेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. विठ्ठलाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत वेगळी आव्हानं आहेत. देव म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारलेल्या तरुणाला आता वास्तववादी भूमिकेत सादर करायचं आहे. या कॅरेक्टर्समध्ये वेगवेगळे शेडस पहायला मिळतील. त्याचं घरी एक रूप आणि कामाच्या ठिकाणी काहीसं कठोर रूप दिसतं. एकाच व्यक्तिरेखेत असलेली दोन रूपं दिग्दर्शक मंदार देवस्थळींच्या दिग्दर्शनाखाली सादर करायला मिळणं हि माझ्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे.
२. तुझ्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांग ?
- यात मी इंद्रजीत नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, हा इंद्रा या नावानं ओळखला जातो. हा कॅालेजमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला मुलगा आहे. खूप सोफेस्टिकेटेड, आईचा लाडका, कुटुंबात थोरला आहे. मनाप्रमाणं किंवा गुणवत्तेनुसार काम मिळत नसल्यानं तो एक प्रकारचं काम स्वीकारतो. त्यातही तो प्रामाणिकपणा आणि माणूसकी जपतो. काम वेगळ्या धाटणीचं असल्यानं ते करताना त्याला मजा येतेय. मूळात अजिंक्य म्हणून मी असा मुळीच नाही. माझा स्वभाव नसताना ते उत्तमरीत्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं आव्हान या कॅरेक्टरमध्ये आहे.
३. मंदार देवस्थळी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत, त्यांच्यासोबत तू पहिल्यांदा काम करतो, तो अनुभव कसा आहे ?
- मंदार देवस्थळी खूप चांगले दिग्दर्शक आहेत. दोन वाक्यांमधला पॅाझ कसा कॅश करायचा किंवा वाक्य न बोलता अभिनयाद्वारे भावना कशी पोहोचवायची ही कला त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमते. यावर आम्ही डिस्कशन करून चांगले सीन्स करत आहोत.
४. तरुणांच्या गळ्यातील ताईत हृता दुर्गुळे या मालिकेत तुझी सहकलाकार आहे, तुझा तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे ?
- हृता दुर्गुळे ही खूप सुंदर अभिनेत्री असल्यानं तिच्यासोबत काम करण्याचा छान अनुभव आहे. मालिकेची संपूर्ण टीमच अतिशय एनर्जेटीक आणि कमालीची परीपूर्ण आहे.
५. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत काम करताना दडपण येतं का ?
- ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेंसोबत माझा इन्ट्रोडक्शन सीन होता. त्यांचा अभिनय पाहिल्यावर मला प्रश्न पडला की, इतक्या सहज कसं काय कोणी काम करू शकतं? सहज अभिनय कसा केला जातो हे त्यांच्याकडं पाहून शिकणं ही माझ्यासाठी जणू पर्वणीच आहे. त्यांच्यासोबत सीन्स करताना खूप शिकतोय.
हेही वाचा - सिध्दार्थच्या निधनाने शहनाझ गीलवर कोसळला दुःखाचा डोंगर