अमरावती - दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबत नाळ चित्रपटातील उत्तम अभिनयामधून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचलेला अमरावतीमधील बालकलाकार श्रीनिवास पोकळे उर्फ चैत्या याच्या घरी सुध्दा गणेश उत्सव मोठ्या आनंदात सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी चैत्याने यंदाही पर्यावरणपूरक अशा मातीच्या गणपती बाप्पाची स्थापना घरी केली आहे.
कोरोनामुळे गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी निर्बंध असल्याने यंदा मौज मजा करता येणार नसल्याची नाराजी चैत्याने व्यक्त केली. सोबत कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करण्याच आवाहनही त्याने केले आहे.
सध्या सर्व सेलिब्रिटी हे लॉकडाऊनमुळे घरी राहून वेळ घालवत आहेत. नाळ या चित्रपटात उत्तम अभिनयातून घराघरात पोहचलेला अमरावतीमधील बालकलाकार श्रीनिवास पोकळे उर्फ चैत्या हा सुध्दा घरीच आहे. कुटुंबासोबत राहून सध्या मोठ्या आनंदात गणपती उत्सव तो साजरा करत आहे.
मागील वर्षी धूम धडाक्यात गणपती उत्सव आम्ही साजरा केला. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने सरकारचे नियम पाळूनच गणपती उत्सव साजरा करत असून घरी पर्यावरणपूरक मातीचा गणपती बसविल्याची माहिती चैत्याने दिली. सुरुवातीला लॉकडाऊन कडक असल्याने घरी करमत नव्हते. परंतु आता ऑनलाइन शाळा सुरू झाल्याने वेळ चांगला जातो असे चैत्या सांगतो. दरम्यान, आता चैत्या सायकल फिरवून सुट्याचा आनंद घेताना दिसत आहे.