मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा 'छपाक' चित्रपट आज (१० जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी दीपिकाने मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकली आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि इतरांसाठी प्रेरणा बनलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मी अग्रवाल यांची भूमिका साकारण्यासाठी 'मालती' नावाचे पात्र साकारले आहे.
अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यानंतर पुन्हा उमेदीने उभी राहणारी मालती दीपिकाने ताकतीने साकारल्याची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळाली होती. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट एक नवी सामाजिक जाणीवा देणारा आणि परिवर्तनाच्या वाटचालीतला महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो, हे या ट्रेलरवरून पाहायला मिळाले होते.
हेही वाचा -'छपाक' ट्रेलर : सद्य सामाजिक स्थितीवर आवाज बुलंद करणारी सत्यकथा
प्रदर्शनापूर्वी बऱ्याच वादविवादात हा चित्रपट अडकला होता. मात्र, अखेर आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता अजय देवगनचा 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपटही आज प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची शर्यत लागली आहे. यामध्ये कोणता चित्रपट बाजी मारेल, हे बॉक्स ऑफिसचे आकडे समोर आल्यानंतरच समजेल.
हेही वाचा -'मला तुझा अभिमान वाटतो', दीपिकाचा 'छपाक' पाहून रणवीर सिंग भावूक