मुंबई - बॉलिवूडचे लोकप्रिय कपल 'दीपवीर' म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीप सिंग यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रणवीरच्या '८३' या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी दीपिकाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे दीपवीरची रिअल लाईफ जोडी रिल लाईफमध्येही पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे
१९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाची कथा '८३' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम लंडनला रवाना झाली आहे. तर, दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी यांची भूमिका साकारणार आहे.
रणवीर सिंगने सेटवरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. 'माझ्या पत्नीशिवाय माझ्या पत्नीची भूमिका कोण चांगली साकारू शकेल', असे त्याने या फोटोवर कॅप्शन दिले आहे. तर, त्याने आणखी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत दीपिका रणवीरला बॅटने मारताना दिसत आहे. 'माझी रिल आणि रिअल लाईफची कथादेखील अशीच आहे', असे मजेदार कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.
रणवीर-दीपिकाने आत्तापर्यंत 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचीही पसंतीही मिळते. आता दोघांनाही पुन्हा एकदा '८३' चित्रपटात एकत्र पाहता येणार आहे.