चंद्रपूर - आजच्या डिजीटल युगात बहुतेकाकडे स्मार्ट फोन आले आहेत. या फोन मधील सामाजीक माध्यमांच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जग जवळ आलेले आहे. व्हॉटसअप, फेसबुक, इंस्ट्राग्राम आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून ज्ञान, मनोरंजन आणि संवाद सुलभ झाला आहे. याच यूट्यूबच्या माध्यमातून चिमूर क्रांती भूमीतील तरुण आशु उर्फ आशिष बोबडे याचा 'चिमूर का छोकरा' प्रचंड गाजतोय. ग्रामीण भाषेतील विनोदी डबींगमूळे अवघ्या एका वर्षात त्याच्या फॉलोअर्सची संख्या एक लाखापेक्षा जास्त झाली आहे.
लहानपणापासूनच कोणाच्या आवाजाची नक्कल करणे, त्यातून विनोद तयार करून मित्रमंडळींचे मनोरंजन करणे, ही आशिषची आवड होती.
पुढे महाविद्यालयीन काळातही त्याची ही कला वृद्धिंगत झाली. पुढे यूट्यूबच्या माध्यमातून त्यालाही व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळाली. याचा अभ्यास करता करता गुगलवरून विविध प्रकारची विज्ञान विषयक किंवा विविध शोधाविषयीची माहिती सामान्य ज्ञान या सदरा खाली टाकणे सुरू केले. या माहितीमध्ये तो विविध स्लाईड दाखवून बॅकग्राऊंड आवाज देत होता.
सुरुवातीला त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पुढे डिसेंबर २०१७ साली त्याने इंन्ट्राग्रामवर फॉलोअर्स कसे वाढवायचे या विषयी हिंदीत आणि शोध व सामान्य ज्ञानाच्या माहितीचे व्हिडिओ बनवून टाकणे सुरू केले.
मे २०१८ मध्ये अस्सल ग्रामीण भाषेत स्टुअर्ट लिटल या इंग्रजी सिनेमाचे डबींग करून 'चिमूर का छोकरा' या टॅग खाली व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओला यूट्यूबवर साडे चार लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले. त्यामुळे त्याचा उत्साह आणखी वाढला. आत्तापर्यंत त्याने ५२ व्हिडिओ डबिंग करुन टाकले आहेत.
यापैकी 'डब्लू डब्लु ई' चे डंबींग २७ लाख व्हिवर्सनी पाहिले आहे. त्याच्या कोरिया अमेरिका यांच्यातील शित युद्धावरील व्हिडिओलाही दीड लाख व्हिव्ज मिळाले आहेत. तर, डोनार्ड ट्रम्प, अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, इम्रान खान यांच्या व्हिडिओचेही त्याने डबिंग केले आहेत. त्याच्या फॉलोअर्सची संख्या एक लाखापेक्षा जास्त झाल्याने यूट्यूबकडून त्याला पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्याच्या 'स्टँड अप कॉमेडी - आशिष बोबडे' या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने यामध्येच पुढे करिअर करण्याचा आशुचा मानस आहे.