मुंबई - 'इसरलंय, 'त्या मला काय माहित?', हे डायलॉग सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे संवाद लोकप्रिय झाले आहेत, त्या पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. आता हाच 'पांडू' म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकर आता कॉमेडीच्या मंचावर एन्ट्री करणार आहे. 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये प्रल्हाद सर्वांना हसवताना दिसणार आहे.
'कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे', असं म्हणत गेली 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं 'शेलिब्रिटी पॅटर्न' हे नवीन पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या पर्वात प्रेक्षकांचे लाडके कलाकार कॉमेडी करून त्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत. या पर्वात आता पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकरची एंट्री होणार आहे.
प्रल्हादची 'पांडू' ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना हसवतेच. आता 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर कॉमेडी करून प्रेक्षकांचे किती मनोरंजन करेल हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल. प्रल्हादच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांना 'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागात पाहायला मिळेल.