मुंबई - बॉलीवूड मधील एका निर्माता-दिग्दर्शकाला तब्बल २०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक ११ ने अंधेरी परिसरातून अजय रामस्वरूप यादव (वय ५४) या बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शकाला अटक केलेली आहे.
दिल्लीतील व्यावसायिक व साई स्पिरिट प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीस त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता होती. भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांची ओळख प्रायव्हेट फायनान्स उपलब्ध करून देणाऱ्या अजय यादव यांच्याशी झाली होती.
अजय याने स्वत:ची प्रायव्हेट फायनान्स कंपनी असून अँगलो एन्टरप्राइझेस या नावाने कंपनी चालवत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या उत्तर प्रदेश येथील कंपनी कार्यालयात भेट देऊन २०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच, २०० कोटी रुपये कर्ज मंजूर झाल्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर तक्रारदार यांना प्रायव्हेट फायनान्स प्रोसेस साठी २० लाख रुपये अँगलो इंटरप्राईजेस या कंपनीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते.
त्यानंतर एक तासातच २०० कोटी रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील, असे आश्वासनही दिले होते. याप्रकरणी तक्रारदारांनी २० लाख रुपये अजय यादव यांनी सांगितलेल्या बँक अकाउंट मध्ये आरटीजीएसद्वारे भरले होते. मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्यांनी तक्रारदाराचा फोन घेणे सोडले. तसेच, स्वतःचा मोबाईल फोन सुद्धा बंद करून ठेवला होता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने यासंदर्भात मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक ११ ने या प्रकरणी तपास करत अंधेरी लोखंडवाला परिसरातून अजय रामस्वरूप यादव या आरोपीला अटक केली.
चित्रपट निर्मितीमध्ये कर्जबाजारी झाल्याने या दिग्दर्शकाने अशाप्रकारे लोकांना फसविण्याचा मार्ग निवडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अजय यादव याने ६ हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्याने दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट मुव्हिजही यूट्यूबवर प्रदर्शित झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून त्याला या व्यवसायात तोटा झाला आहे.
लोकांना फसवण्यासाठी त्यांनी बोगस फायनान्स कंपनीची स्थापना करून कंपनीच्या नावाने बँक अकाउंट उघडले होते. मात्र नवीन चित्रपट बनवण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे गरजू व्यक्तींना करोडो रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कंपनीच्या प्रोसेसिंग फी म्हणून लाखो रुपये उकळत होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.