मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक तारेतारका चमकत असतात. यातील सई ताम्हणकर आणि करिष्मा कपूर या दोघींचा चाहतावर्ग मोठा आहे. अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची सुकन्या करिष्मा कपूरने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मजल दरमजल करत तिने लोकप्रियतेचे उच्च शिखर गारठले. सांगलीची सई ताम्हणकर आधी नाटकं मग सिरियल्स आणि नंतर मराठी व हिंदी चित्रपट असा प्रवास करत आज प्रसिद्धीच्या उंच शिखरावर विराजमान आहे. सईने हिंदीत सुभाष घई यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाइट’, तर मराठीत ‘सनई चौघडे’ या चित्रपटांतून एकाच वर्षी पदार्पण केले.

करिष्मा कपूर ही ‘स्टार कीड’ असली तरी तिला फिल्म इंडस्ट्री जम बसविण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. ती दिसायला सुंदर होती/आहे. परंतु सुरुवातीच्या काळात करिष्माला ‘कोल्ड ब्युटी’ म्हणून हिणवत. यामुळे नाराज झालेल्या आणि चिडलेल्या करिश्माने आपल्यावर मेहनत घेतली आणि नंतर तर ती एक ‘हॉट’ अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. यात तिला सुपरस्टार गोविंदा बरोबरच्या चित्रपटांची आणि त्यातील गाण्यांची साथ लाभली. राजा बाबू, कुली नं १, बीवी नं १, हिरो नं १, साजन चले ससुराल सारखे सुपरहिट ठरले. गोविंदा आणि तिच्यावर चित्रित झालेल्या ‘सरकाय लो खटिया जाडा लागे...’ सारख्या गाण्यांनी लोकप्रियता तर मिळवलीच परंतु करिष्मा प्रेक्षक-प्रिय झाली.

सई ताम्हणकर सुरुवातीपासूनच ‘हॉट’ बिरुद मिरवत आली आहे. तिने सुरुवातीच्या काळात आमिर खान अभिनित ‘गजनी’ मध्ये सहाय्यक भूमिका केली होती तसेच ‘हंटर’, ‘लव्ह सोनिया’ सारख्या चित्रपटातून ‘हॉट भाभी’ चा अवतार धारण केला होता. परंतु सई मराठीत जास्त रमली. ‘पुणे ५२’ मधील तिच्या भूमिकेने मराठी नायिकांना ‘बोल्ड’ दर्जा प्राप्त करून दिला. ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ हे बिरुद तिच्यावर चपखलपणे बसते तरीही सईने आशयघन आणि कमर्शियल चित्रपटांतून झळकत आपली वेगळी इमेज तयार केली. तू ही रे, क्लासमेट्स, वजनदार, नो एंट्री पुढे धोका आहे सारख्या चित्रपटांतून सई ताम्हणकर ने विविधांगी भूमिका सादर केल्या. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाने तर सई सकट त्यात काम करणाऱ्या सर्वांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणले.

करिष्मा कपूर ने हम साथ साथ है, राजा हिंदुस्थानी सारख्या व्यावसायिक चित्रपटांबरोबरच फिझा, झुबेदा सारखे आशयघन चित्रपटही केले. तश्या अनेक पुरस्कारांवर तिने आपल्या नावाची मोहोर उमटवली होती परंतु शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबतच्या ‘दिल तो पागल है’ साठी करिश्माला सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सई ला झी गौरव, संस्कृती कलादर्पण मध्ये पुरस्कार मिळालेले आहेत तसेच तिला २०१८ मध्ये महाराष्ट्र अचिव्हर्स अवॉर्ड ने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे.
करिष्मा कपूर ने ६०-७० चित्रपटांतून अभिनय केला आणि नंतर लग्न करून संसाराला लागली. परंतु तिच्या नशिबात संसारसुख नव्हते आणि तिचा डिव्होर्स झाला. सई ताम्हणकरने योग्य वयात संसार थाटला परंतु तिच्याही नशिबात संसारसुख नव्हते आणि दोनेक वर्षांतच तिचा घटस्फोट झाला. सई आणि करिष्मा आजच्या जमान्यातील स्त्रिया असून काडीमोड झाला म्हणून आयुष्य संपले या विचारांच्या अजिबात नाहीत. करिष्मा कपूर ने गेल्या वर्षी ‘मेंटलहूड’ या वेब सीरिजमधून अभिनय पुनःपदार्पण केले तसेच सई ताम्हणकर ‘डेट विथ सई’ या सक्सेसफुल वेब सिरीज नंतर आता स्वप्नील जोशीसोबत ‘समांतर २’ या मराठी वेब सिरीजमध्ये झळकणार आहे.

२५ जून हा सई ताम्हणकर आणि करिष्मा कपूर यांचा प्रकटदिन असून दोघींनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा - इंदिरा गांधीच्या भूमिकेत अवतरणार कंगना रणौत, 'इमर्जन्सी'ची तयारी सुरू!!