मुंबई - संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे लोक अडकून पडलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कधी वाढतोय तर कधी कमी होतो आहे. मात्र या सगळ्यापासून दूर असलेल्या मुंबईतील दगडी चाळीत मात्र सध्या आनंदी आनंद आहे. यामागचं कारण आहे डॅडी उर्फ अरुण गवळी यांची धाकटी मुलगी योगिता हीचं लग्न उद्या पार पडणार आहे.
गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (८ मे) रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. खरं तर २९ मार्च रोजीच या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न तेव्हा होऊ शकलं नाही. मात्र आता मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघे उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे दगडी चाळीतच अत्यंत साधेपणाने हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
अक्षय आणि योगिता यांच्या हळदीचा कार्यक्रम आज रात्री पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी प्रत्यक्ष लग्न होणार आहे. या लग्नाला खुद्द डॅडी म्हणजेच अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. विवाहाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी पॅरोलची मागणी केली होती, ती तुरुंग प्रशासनाने मंजूर केलेली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे लग्न होणार असल्याने या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातील, असं अक्षयने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत हे लग्न होणार असलं तरीही उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर आणि फेस मास्क दिले जातील. लॉकडाऊन असल्याने धुमधडाक्यात लग्न करता येणं शक्य नसलं तरीही योग्य वेळी धूमधडाक्यात रिसेप्शनचं आयोजन केलं जाईल, अशीही माहिती त्याने दिली.
डॅडीच्या बडेजावपणाला बसणार खीळ -
यापूर्वी 5 डिसेंबर 2007 रोजी अरुण गवळी यांची ज्येष्ठ कन्या गीताच्या लग्नात त्यांनी महालक्ष्मी रेसकोर्स वरील दोन्ही तर्फ क्लब बुक करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला गीताताईच्या लग्नाचं आमंत्रण होतं. या लग्नाला त्यावेळी माध्यमांनी विशेष कव्हरेज दिले होतं. सत्ताधरी आणि विरोधक आशा सगळ्याच राजकीय पक्षातील बड्या नेत्यांनी रिसेप्शनला हजेरी लावून नववधूला आशीर्वाद दिले होते. यात विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांचाही समावेश होता. अरुण गवळी यांनी स्वतः प्रत्येकाचे स्वागत करून त्यांचा योग्य मानपान केला होता. विशेष म्हणजे ज्या पंटर लोकांनी या लग्नात घरच्या माणसासारखे राबून काम केलं, अशा 17 जणांना बक्षीस म्हणून नवी मुंबईत 17 फ्लॅट गिफ्ट केल्याची बातमी माध्यमात गाजली होती. मात्र या सगळ्या बडेजावपणाला लॉकडाऊनमुळे कात्री लागली आहे. त्यामुळे लग्नापेक्षा या दोघांचं रिसेप्शन कस पार पडतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.