मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या ट्विटमध्ये त्याने एका मोदी समर्थकाने केलेल्या ट्विटचा स्क्रिन शॉट शेअर केला होता. या मोदी समर्थकाच्या ट्विटमध्ये अनुराग कश्यपच्या मुलीला अश्लिल भाषेत बलात्काराची धमकी देण्याचा आशय होता. आता त्याच्याविरोधात अनुराग कश्यपने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल केले जाणे हे आता नेहमीचेच झाले आहे. काही कलाकार या ट्रोलिंगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तर, काही कलाकार मात्र, त्यांना सडेतोड उत्तरही देताना पाहायला मिळतात. अनुराग कश्यपनेही या ट्रोलर्सला धडा शिकवण्याचे ठरवले आहे. त्याच्या मुलीला अशाप्रकारच्या अर्वाच्च भाषेत धमकी देणाऱ्याविरोधात त्याने अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ५०४ आणि ५०९
कलमानुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम ६७ च्या आयटीसी कायद्यानुसार देखील ही तक्रार दाखल झाली आहे.
याबद्दल त्याने ट्विटरवरून पोलिसांचे आभारही व्यक्त केले आहेत. 'एक वडील म्हणून आता मी सुरक्षित आहे, मला सहकार्य केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार', असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.