मुंबई - महाराष्ट्राच्या सत्तेचा तिढा सुटण्याची चिन्ह अद्याप तरी दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर प्रसिध्द अभिनेता अनिल कपूर यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मजेशीर होते.
'मी नायक आहे आणि हेच माझ्यासाठी चांगले आहे', असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. पुण्यातील एका ज्वेलरी शॉपचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
'नायक' या लोकप्रिय चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते. एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊनही राज्यात किती बदल होऊ शकतात, हे या चित्रपटात पहायला मिळाले होते. याच अनुषंगाने अनिल कपूर यांना पुण्यातील पत्रकारांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का ? असे विचारले होते. त्यावर जराही वेळ न दवडता ते म्हणाले, " बरेच जण मला म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री व्हा, त्या सर्वांना मी एकच सांगतो मी नायकच बरा आहे."
हेही वाचा -'तिढा सुटे पर्यंत अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा'
सोशल मीडियावरही मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा रंगली आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करावे असे एका नेटीझन्सने सुचवले होते.
हेही वाचा -शरद पवारांना आरे तुरे करणाऱ्यांना जितेंद्र जोशीने सुनावले खडे बोल, पाहा व्हिडिओ