मुंबई - अभिनेता अमेय वाघचा स्वॅग नेहमीच हटके असतो. रंगभूमी, वेबसीरीज, मालिका आणि चित्रपट अशा चारही क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या अमेयला आपण आरजे झालेलंही पाहिलं आहे. मात्र, आता तो युट्यूबर म्हणून लोकांसमोर येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात घरकोंबडा होऊन बसलेल्या प्रत्येकाला अमेय युट्युबमार्फत भेटायला येणार आहे. ज्यात क्षितीज पटवर्धनचे लिखाण फोडणी देण्याचे काम करणार आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अमेयने याची अधिकृत घोषणा केली आहे.
लॉकडाऊनदरम्यान घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन अमेय सर्व प्रेक्षकांना करत आहे. या काळात अमेय घरातच बसून आहे. मात्र, सोशल साईटवर तो सक्रिय आहे. अशात आपल्या व्हिडिओद्वारे तो दैनंदिन जीवनातले किस्से त्याच्या हटके स्टाईलद्वारे मांडताना दिसणार आहे. तरुण वर्गामध्ये अमेयची क्रेझ असून त्याचे हे सारे मजेदार किस्से ऐकण्यासाठी अमेयचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. याचमुळे आता या सर्वांसाठी अमेयने खास युट्यूब चॅनल सुरू केला आहे. अमेयच्या खास पुणेरी सेन्स ऑफ ह्युमरचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्याचा हा नवीन सोशल मीडियावरील प्रयोग त्याच्या चाहत्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे.
एकीकडे लॉकडाऊनमध्ये असलेल्या रिकाम्या वेळात नक्की काय करायचं, असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडलेला आहे. काहीजण तर दिवसभर सोशल मीडियाचा वापर करत असतात. अशाच नागरिकांचं थोडं मनोरंजन करण्याचा प्रयत्न अमेय आणि त्याच्या टीमने केला आहे. अमेयला सोशल मीडिया तसा नवीन नाही. यापूर्वी त्याने निपुण धर्माधिकारीसोबत 'कास्टिंग काऊच'चे सिझन केले आहेत. मात्र, यावेळी अमेय एकटाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे, त्याचा हा प्रयोग चाहत्यांना आवडतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.