मुंबई - लॉकडाऊन काळात कधीही न थांबणारी मनोरंजन सृष्टी देखील थांबली होती. अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता मात्र, अनलॉकमुळे मनोरंजन सृष्टी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. गणराज असोसिएट्सची आणि संजय दावरा फिल्मसची निर्मिती असलेला मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाचे राहिलेले चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. या चित्रपटाचे अवघ्या दोन दिवसांचे चित्रीकरण लॉकडाऊनमुळे राहून गेले होते. अनलॉकची बातमी मिळताच चित्रपटाच्या टीमने राहिलेले चित्रीकरण पूर्ण केले.
या चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांची प्रमुख भूमिका आहे. अभिजित अब्दे यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाच्या काही महत्वाच्या दृश्यांच्या चित्रीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता परंतु, लॉकडाऊनमुळे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. राज्य सरकारने चित्रीकरणाला परवानगी देताच या चित्रपटाच्या टीमने नवीन आराखडा आखत चित्रीकरण पूर्ण केले.
सरकारच्या नियमानुसार चित्रीकरणासाठी एकूण टीमच्या फक्त ३५% लोकांना एका वेळी सोबत काम करता येणार होते. त्यामुळे टीममधल्या प्रत्येकाने ३ माणसांची कामे केली. मुळशी रोडवरील गरुड माची या गावात चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण गाव सॅनिटाइझ करण्यात आले. चित्रीकरणा दरम्यान कलाकारांनी स्वतःचा मेकअप स्वतःच केला. याच बरोबर हे चित्रीकरण सुरू करण्याअगोदर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी गावात पोहोचताच स्वतःहून काही दिवस क्वॉरंटाईन झाली होती.
शासनाने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर संपूर्ण टीम लगेच कामाला लागली. चित्रीकरण स्थळाची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळवळी, असे चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव यांनी सांगितले. 'हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक होतो. चित्रीकरणाची परवानगी मिळताच सॅनिटायझेशन व्यवस्था, ग्लोव्हज्, मास्क या सगळ्या गोष्टींसह नियमानुसार चित्रीकरणाला सुरूवात केली', असे निर्माते संजय दावरा यांनी सांगितले.
राहिलेले चित्रीकरण कधी करता येईल हे माहितीच नव्हते, तरी देखील नंतर जास्त वेळ घालवायचा नाही म्हणून अर्धी तयारी अगोदरच करून ठेवली होती. प्रत्येक गोष्टीची मांडणी कशी करता येईल, यापासून ते कमीत-कमी लोकांसोबत कसे काम करावे याचे सुद्धा प्लॅन करून ठेवले होते. त्यामुळेच राहिलेले संपूर्ण चित्रीकरण दोन दिवसात संपवता आल्याची माहिती दिग्दर्शक आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने दिली.
गणराज असोसिएट्स 'मनाचे श्लोक' या चित्रपटानंतर सुद्धा मराठी प्रेक्षकांसाठी वेगळ्या विषयांचे आशयघन चित्रपट घेऊन येत आहे. यात 'बघतोस काय मुजरा कर २' आणि 'फकाट' या चित्रपटांचा समावेश आहे.