मुंबई - क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये ऐतिहासिक ठरलेल्या १९८३ सालच्या विश्वचषकावर आधारित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात इतरही बऱ्याच कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. रणवीरने या सर्वांचे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
२५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले.
'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत. या सर्व कलाकारांचे फर्स्ट लुक प्रदर्शित झाले आहेत.
माजी क्रिकेट कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, चिराग पाटील हा त्याचेच वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
१० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.