मुंबई - मराठी रंगभूमीचा मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. ५ नोव्हेंबरला प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
रोहिणी हट्टंगडी यांनी आजवर अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच, छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही त्यांची भूमिका पाहायला मिळते. त्यांना आत्तापर्यंत 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार', 'अर्थ' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तसंच २०१७ मध्ये बालगंधर्व परिवारातर्फे 'जीवनगौरव' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. यंदाच्या विष्णुदास भावे या पुरस्कारावरही त्यांची मोहोर लागली आहे.
२५ हजार रुपये रोख, विष्णुदास भावे पदक, स्मृती चिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हेही वाचा -IFFI 2019: 'इफ्फी'च्या तयारीला वेग; १५ नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण करणार
'विष्णुदास भावे' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करत आली आहे. सांगली येथील ही समिती आणि राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी रंगभूमीदिनी दिवशी हे मानाचे पदक दिले जाते.
मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्या ज्येष्ठ कलाकारास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री. काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, शरद तळवलकर, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, दिलीप प्रभावळकर (२००७), रामदास कामत (२००८), शं.ना. नवरे (२००९), फैय्याज इमाम शेख (२०१०), रत्नाकर मतकरी (२०११), अमोल पालेकर (२०१२), महेश एलकुंचवार (२०१३), डॉ.जब्बार पटेल (२०१४), विक्रम गोखले (२०१५), जयंत सावरकर (२०१६) यांना मिळाला आहे.
हेही वाचा -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ४ वर्षांनी 'डॅडी' दगडी चाळीत परतले