मुंबई - बॉलिवूडची मेलोडी क्वीन आशा भोसले यांचा आज ८६ वा वाढदिवस आहे. 'गोल्डन आशा' या नावाने लोकप्रिय झालेल्या आशाताईंनी आत्तापर्यंत १६ हजारापेक्षा जास्त गाणी गायली आहेत. हिंदी, मराठीसह इतरही भाषेतील गाण्यांना त्यांनी आपल्या आवाजाने स्वरसाज चढवला आहे. त्यांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये जेवढे चढउतार आले, तेवढ्याच त्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच कठिण प्रसंगाना सामोरे गेल्या आहेत. यावेळी त्यांची मोठी बहीण आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर या त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मात्र, एका कारणामुळे या दोघींमध्येही दुरावा आला होता.
लता मंगेशकर यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली होती. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. पुढे आशाताईंनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संगीत क्षेत्रात उडी घेतली. मात्र, लहानपणापासूनच आशाताईंचा वेगळा स्वभाव होता. त्यांना कोणत्याच नियमांमध्ये बांधुन राहायला आवडत नव्हतं. त्यांनी आपले वेगळे मार्ग निवडले.
१६ व्या वर्षीच केलं होतं लग्न -
आशाताईंनी वयाच्या १६ व्या वर्षीच गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. तेव्हा गणपतराव हे ३१ वर्षांचे होते. खूप कमी लोकांना माहिती असले, की गणपतराव हे लतादिदींचे सेक्रेटरी होते. त्यामुळे लतादिदींना आशाताई आणि गणपतरावांचे नाते मंजूर नव्हते. याच गोष्टीमुळे लतादिदी आणि आशाताईमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
सर्वांचा विरोध पत्कारुन केलं होतं लग्न -
आशाताईंनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन गणपतरावांशी लग्न केलं होतं. पुढे त्यांना ३ मुलेही झाले होते. मात्र, पुढे त्यांच्यात वाद निर्माण झाले. त्यामुळे दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दोघे वेगळे झाल्यानंतरही आशाताई आणि लता मंगेशकर यांच्यातला कडवटपणा दूर झाला नव्हता.
आर. डी. बर्मनसोबत भेट -
पुढे आशाताईंनी आर. डी. बर्मन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. आर. डी. बर्मन हे विवाहित होते. रीता पटेल यांच्यासोबत त्यांचा घटस्फोट झाला होता. आशाताई आणि आर. डी. बर्मन यांचं संगीत प्रेम त्यांना एकमेकांजवळ घेऊन आलं. विशेष म्हणजे आर. डी. बर्मन हे आशाताईंपेक्षा ६ वर्षांनी लहान होते. त्यांनी आशाताईंना प्रपोज केल्यानतर दोघांनी १९८० साली लग्नगाठ बांधली.
नेहमी खंबीर राहिल्या आशाताई -
आशाताईंच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या. काही वाईट प्रसंगानाही त्यांना सामोरे जावे लागले. तरीही त्या नेहमी खंबीर राहिल्या. आर.डी.बर्मन यांच्या निधनानंतरही त्यांनी स्वत:ला सावरले. संगीतक्षेत्रातही त्यानी आपलं अमुल्य योगदान दिलं आहे. त्यांच्या आवाजाची छाप आजही चाहत्यांवर कायम आहे.