पूर्वी प्रत्येक चित्रपटाचे यश हे ‘हाऊसफुल बोर्ड’ आणि सिनेमा किती आठवडे चालला यावरून ठरत असे. त्याकाळी हिट चित्रपट म्हणजे एकाच चित्रपटगृहात २५ आठवडे (सिल्व्हर ज्युबिली)वा ५० (गोल्डन ज्युबिली), ६० (डायमंड ज्युबिली) किंवा त्याहूनही अधिक आठवडे चाललेला चित्रपट होय. परंतु आधुनिक काळात चित्रपटांच्या यशाची मोजपट्टी बदललीय. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे IMDb सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक मानकांवर चित्रपटाचे यश मोजले जाते. त्याच मापदंडाच्या आधारावर नुकताच ओटीटी वर प्रदर्शित झालेला ‘शेरशाह’ हा IMDb वरील सर्वात लोकप्रिय ‘ओरिजिनल लँग्वेज’ चित्रपट ठरला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अभिनित ‘शेरशाह’ हा कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या जीवनावर आधारित असून त्यात सिद्धार्थ मल्होत्राने आजवरची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. अमेझॉन ओरिजिनल मूव्ही ‘शेरशाह’ने प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवल्यानंतर अधिकृतपणे मोठ्या लीगमध्ये प्रवेश केला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवरील हा बायोपिकसदृश युद्धपट IMDb वर सिद्धार्थ मल्होत्राचा सर्वाधिक फॅन-रेटेड चित्रपट बनला आहे. त्याचे युजर्स रेटिंग १० पैकी ८.९ असून ६४ हजार IMDb युजर्सनी त्यासाठी मतदान केले आहे. या आठवड्याच्या IMDbPro मूव्हीमीटर चार्टवर हा चित्रपट जागतिक स्तरावर #१० वर ट्रेंड करत आहे, ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय चित्रपटांचा क्रमांक लागतो आणि जगभरातील लाखो IMDb ग्राहकांच्या पेज व्ह्यूजवर IMDbPro डेटाद्वारे निर्धारित केला जातो.
ओटीटी वर किती लोकांनी चित्रपट पहिला हे थिएटरच्या बॉक्स ऑफिसप्रमाणे कळत नसले तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे निर्मात्यांना ती माहिती मिळू शकते. आयएमडीबी इंडियाच्या प्रमुख यामिनी पाटोडिया म्हणाल्या, "भारतातील स्टार्सचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल, चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी (IMDb ) आयएमडीबीला भेट देतात आणि शेरशाहच्या उच्च फॅन-रेटिंगचे रेटिंग आणि पुनरावलोकन करून त्यांची आवड शेअर करतात. त्यामुळे निश्चितच हे इतर चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी आणि त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये जोडण्यासाठी प्रेरित करणारे आहे."
विष्णु वर्धन दिग्दर्शित, शेरशाह कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनापासून प्रेरित आहे आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद यांच्यासह सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘शेरशाह’ ला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाबद्दल बोलताना धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता म्हणाले, “ कथेवर विश्वास ठेवून, बत्रा यांच्या कुटुंबाने आम्हाला त्यांची कथा सांगण्याची संधी दिली, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांची कथा आणि त्यांच्या शौर्य आणि त्यागाची अमर कथा जगासमोर आणण्यासाठी मदत केल्याबद्दल अमेझॉन प्राईम व्हिडिओचे आभार व्यक्त करतो. चित्रपटाला सर्व बाजूंनी मिळालेले प्रेम पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत. शेरशाह हा खरोखरच एक खास चित्रपट आणि कथा आहे, जी जगाने पाहण्याची गरज आहे. चित्रपटाचे IMDb रेटिंग प्रेक्षकांचे मिळत असलेले कौतुक आणि सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी, दिग्दर्शक विष्णू वर्धन यांची दूरदृष्टी, आमचे सहनिर्माते काश एंटरटेनमेंट आणि संपूर्ण टीम यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कलाकारांनी घेतलेली मेहनत याचे फलित आहे."
'शेरशाह' धर्मा प्रॉडक्शन आणि काश एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती असून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे.
हेही वाचा - टॉलिवूड फोटोगॉफर 'असा' करत होता रशियन मॉडेलचा छळ; अलेक्झांड्राच्या मृत्यूचे गूढ उकलेले