मुंबई - 'हम तो डूबेंगे सनम, साथ में तुम्हें भी ले डूबेंगे' ही हिंदीमधील म्हण सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांना एकदम लागू होत आहे. 'हंगामा 2' या चित्रपटातून शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. मात्र, राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे तीच्या करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आज न्यायालयाने राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे. आता शिल्पाची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिल्पा राजच्या प्रत्येक व्यवसायात भागीदार असल्याने तीलाही पोलीस चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
'हंगामा' या 2003 मध्ये हिट ठरलेल्या चित्रपटाचा सिक्वेल 'हंगामा -2' येत आहे. तब्बल 14 वर्षांनंतर 'हंगामा 2' मधून शिल्पा पुन्हा चित्रपटसृष्टीत परतत आहे. मात्र, आता राज कुंद्रामुळे ती पुन्हा बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. पॉर्न फिल्मचे शुटिंग करीत असल्याच्या गुन्ह्याखाली राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. तो पॉर्न व्हिडिओ बनवून अॅपवर अपलोड करीत असे, असा त्याच्यावर आरोप आहे. मंगळवारी त्याला न्यायालयाने 23 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती.
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तीचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या बहिणीच्या नवऱ्याची मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हट्सअप ग्रुप, इमेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पाने सुपर डान्सर रिअॅलिटी शोचेही शुटींग थांबवल्याची माहिती नाही. राजच्या प्रत्येक व्यवसायात शिल्पा भागीदार असल्याची माहिती आहे. तसेच त्यामुळे शिल्पाला पण पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो. सध्या तरी या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा कोणताही सक्रिय सहभाग निदर्शनास आलेला नाही, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. पती राजमुळे शिल्पाचे बॉलिवूडमधील कमबॅकचे स्वप्न धुळीस मिळते, की सावरते हे काही दिवसातच कळेल.
सोमवारी रात्री कुंद्राला अटक
अश्लील चित्रफीत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) चौकशीसाठी बोलावले होते. त्याच रात्री उशिरा शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून रयान थारप याला या प्रकरणात अटक करण्यात आली. या दोघांना कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल
राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.
राज कुंद्रा याला सात वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा
अश्लील सिनेमे तयार करुन मोबाईलच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्यावर भा.दं.वि. चे कलम 292, 293, 420, 34 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट यू/एस 2(जी), 3, 4, 6, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्यास राज कुंद्राला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती अॅड. नितीन धांडोरे यांनी दिली.
राज कुंद्रा मास्टर माईंड असल्याची पोलिसांची माहिती
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याच्या भावाने ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. केनरिन, असे त्या कंपनीचे नाव आहे. याच माध्यमातून अश्लील सिनेमे दाखवले जात होते. अश्लील चित्रपट भारतात शूट केले जात होते. त्यानंतर शूट केलेले व्हिडिओ विदेशात राज कुंद्रा आपल्या भावाला वी ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठवत असे.