हैदराबाद - सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी येथील रामोजी फिल्म सिटी येथे वृक्षारोपन करुन ग्रीन इंडिया चॅलेंजमध्ये भाग घेतला. ग्रीन इंडिया चॅलेंजचे संस्थापक आणि राज्यसभेचे खासदार जोगिनीपल्ली संतोष कुमार यांचे तेलंगणा राज्य आणि देशभरात हिरवळ निर्माण करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल बिग बी यांनी अभिनंदन केले.
वृक्षारोपनासाठी घेतलेला पुढाकार, वृक्षारोपनानंतर घेतली जाणारी काळजी, देखरेख याबद्दल अमिताभ बच्चन यांनी संतोषकुमार यांना विचारणा केली. तेलंगणाच्या पालिका प्रशासन व नगरविकास मंत्री के. टी. रामा राव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जीआयसीने अलीकडेच तीन कोटी रोपांची लागवड केली असल्याचे सांगताच बच्चन यांनी आश्चर्य व्यक्त केले. बच्चन म्हणाले की, "हे निश्चितच एक मोठे कार्य आहे आणि पर्यावरणाविषयीच्या त्यांच्या समर्पण आणि वचनबद्धतेबद्दल जाणून घेतल्यावर मला धक्का बसला."
एका तासाच्या आत 2 कोटी सीड बॉलची लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केल्याबद्दल जीआयसीचेही सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन केले. "ग्रीन इंडिया चॅलेंजबद्दल मला माहिती आहे पण यात भाग घेणे ही एक मोठी विलक्षण गोष्ट आहे. जोगिनीपल्ली संतोष कुमार यांना हे मोठे कार्य पुढे नेण्यासाठी मी शुभेच्छा देतो," असे अमिताभ म्हणाले.
ग्रीन इंडिया चॅलेंजसारख्या उदात्त आणि मोठ्या प्रयत्नासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणात सहभाग मिळण्याची आवश्यकता असल्याचे मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. ट्विटर हँडलवरून यामध्ये आणखी तीन लोकांना सहभागी होण्यासाठी आव्हान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तेलुगू सुपरस्टार नागार्जुननेसुद्धा या कार्यक्रमात भाग घेतला. निर्माते अश्विनी दत्त आणि रामोजी फिल्म सिटी एमडी विजयेश्वरी यांच्यासोबत वृक्षारोपनात नागार्जुनने सहभाग घेतला.
योगायोग म्हणजे 27 जुलै ही भारताचे महान वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. कलाम यांनी या कार्यासाठी कशी प्रेरणा दिली याचा उल्लेखही यावेळी संतोष कुमार यांनी केला.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष मुलाखत - अभिनेता श्रेयस तळपदे