मुंबई - काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये 'मीटू' मोहिमेला उधाण आले होते. यावेळी बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शकांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप झाले होते. यात दिग्दर्शक विकास बहलचाही समावेश होता. ज्यानंतर 'सुपर ३०'च्या क्रेडीटमधून दिग्दर्शक म्हणून असलेलं त्याचं नाव हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार आता या प्रकरणात विकास बहलला क्लीन चीट मिळाली असून त्याचं नाव पुन्हा एकदा सुपर ३० च्या क्रेडीटमध्ये झळकणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. मीटू मोहिमेअंतर्गत आरोप होण्याआधीच विकास बहलनं सुपर ३०चं दिग्दर्शन केलं होतं. मात्र, असं असतानाही या आरोपांमुळे त्याचं नाव क्रेडीटमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
२०१५ मध्ये आलेल्या 'बॉम्बे वेलवेट' चित्रपटाच्या प्रमोशनल टूर दरम्यान दिग्दर्शक विकास बहलवर क्रूमधील एका महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला होता. याप्रकरणी पीडित महिला आणि विकास दोघांचीही चौकशी करण्यात आली. ज्यानंतर विकासची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली.