कोरोनाने अनेक संसार उध्वस्त केलेत तसेच अनेकांच्या संसाराची आर्थिक घडीही बिघडवलीय. लॉकडाऊनमुळे अनेकांची रोजीरोटी बंद झाली आणि बऱ्याच लोकांचे दोन वेळच्या जेवणाचेही वांदे झाले आहेत. परंतु आपल्या समाजात अनेकजण देवदूताप्रमाणे गरजू लोकांना मदत करताहेत. नुकतेच त्या यादीसोबत टिस्का चोप्रा चे सुद्धा नाव जोडले गेलेय. टिस्का चोप्राने कोरोनाकाळात आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसोबत पीडितांसाठी अन्नदान केले. तिने कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गरजू लोकांना तांदळाची पाकिटे वाटली आणि अनेक घरात चूल पेटवण्यास मदत केली.
![Tisca Chopra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-tisca-chopra-donates-rice-during-covid-period-mhc10001_20052021204339_2005f_1621523619_858.jpeg)
टिस्का चोप्रा ही बॉलिवूडमधील मोजक्या लोकांपैकी एक आहे जे या कोविड-१९ दरम्यान लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. कोरोनाच्या लढ्यामधील आघाडीच्या क्षेत्रात असणाऱ्या कामगारांना अन्नदान करून ती लोकांची मदत करत आहे. तिने शक्य तितकी आणि शक्य तेव्हड्या लोकांना मदत केली. फक्त तीच नाही तर तिचे वृद्ध पालकसुद्धा, अर्थात सर्व सुरक्षा ध्यानात ठेऊन, या कार्यात सहभागी झाले होते. टिस्का चोप्रा हिने गरजू लोकांना तांदळाची पाकिटे दान करण्यासाठी इंडिया गेट राईस आणि विकास खन्ना यांच्या चॅरिटी संस्थेसोबत सहकार्य करीत हे कार्य केले आहे. या उदात्त कृतीत तिला मदत करण्यासाठी अभिनेत्रीचे पालकही सोबत आले होते. तिने याची माहिती आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.
![Tisca Chopra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-tisca-chopra-donates-rice-during-covid-period-mhc10001_20052021204339_2005f_1621523619_858.jpeg)
टिस्का चोप्राने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सेक्टर १५ मधील गुरुद्वारा येथे पालकांसमवेत .. मला त्यांचा इतका अभिमान आहे की या वयातही त्यांनी रुग्णालयातील # कोविड कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी स्वतः तांदळाच्या पोत्या उचलल्या .. आम्ही आमच्यातर्फे छोटीशी मदत करीत आहोत....”
टिस्का चोप्राचे आई-वडील वृद्ध असूनही या महामारीच्या काळातही आपली सामाजिक बांधिलकी जपताना बघून मानवतेवरचा आपला विश्वास पुन्हा जागृत होतोय आणि लोकांना मदत करतात हे पाहून अनेक जण अशा कृतीसाठी प्रेरित होतील असा विश्वास जागतोय.
हेही वाचा - श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय युवा संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रवीड