मुंबई - नामवंत निर्माते दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी 'शिकारा' चित्रपटावर टीका करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. काश्मिरी जनतेच्या दुखःचे बाजारीकरण झाल्याचे म्हणणाऱ्यांनी त्यांनी गाढव म्हटले आहे.
विधु विनोद चोप्रा म्हणाले, ''मी जेव्हा थ्री इडियट सिनेमा बनवला होता त्याच्या पहिल्या दिवसाची कमाई होती ३३ कोटी आणि आता बनवलेल्या शिकाराची पहिल्या दिवसाची कमाई आहे ३० लाख. या सिनेमासाठी गेली ११ वर्षे मी काम करीत होतो. या सर्व गोष्टी मजेशीर आहेत. कारण मी जेव्हा एका सिनेमाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन ३० कोटी करतो आणि आईची आठवण म्हणून दुसऱ्याचे ३० लाख होते, तेव्हा काहीजण म्हणतात मी काश्मिरी जनतेच्या दुःखाचे व्यावसायकीकरण केले.''
''मला वाटते असा जे विचार करतात ते गाढव आहेत. म्हणून तुम्हाला मला सांगायचे आहे, गाढव होऊ नका. पहिल्यांदा सिनेमा पाहा आणि नंतर मते द्या.'', शिकाराच्या प्रमोशनसाठी मुंबईत केसी कॉलेजमध्ये विधु विनोद चोप्रा आले होते. तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केले.
'शिकारा-अ लव्ह लेटर फ्रॉम काश्मीर', ही कथा काश्मीरच्या १९९० साली घडलेल्या घटनेवर आधारित आहे. काश्मीरच्या एका समुदायाला बेघर करण्यात आले होते. ३० वर्षानंतरही ते आपल्या घरी परतू शकले नाही. या चित्रपटातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सादिया आणि आदिल खान हे दोघेही या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले आहे. सादियाने शांतीची भूमिका साकारली आहे तर, आदिल शिवच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी दिलं आहे.