मुंबई - पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी आज नरेंद्र मोदींचा शपथविधी होणार आहे. राष्ट्रपती भवनात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांना आमंत्रण देण्यात आले असून यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे.
या शपथविधीसाठी अनेक बॉलिवूड कलाकार दिल्लीला रवाना झाले असून या कलाकारांचे विमानतळावरील फोटोही समोर आले आहेत. यात अभिनेता अनिल कपूर, सनी देओल, करण जोहर, कंगना रनौत, शाहिद कपूर, बोमन इराणी, विवेक ओबेरॉय आणि हेमा मालिनी या कलाकारांचा समावेश आहे. तर याशिवाय कमल हसन आणि रजनीकांत हेदेखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भव्य विजयानंतर आज नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी 'बिम्सटेक'सह आठ देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. बिम्सटेकमध्ये भारताशिवाय भूतान, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, नेपाल आणि बांगलादेश आहेत. किर्गिस्तानचे राष्ट्रपती आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.