मुंबई - गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार वेबविश्वात पदार्पण करताना दिसत आहेत. अशात आता किंग खाननेही वेब विश्वात उडी घेतली आहे. शाहरूख 'क्लास ऑफ ८३' वेबसीरिजची निर्मिती करणार असून अभिनेता बॉबी देओल यात भूमिका साकारणार आहे.
या सीरिजच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. बॉबी देओलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती देत नेटफ्लिक्सच्या विश्वात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे म्हटले आहे. अतुल सब्रवाल या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत.
दरम्यान याशिवाय बॉबी देओल लवकरच 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, अक्षय कुमार, राणा दग्गुबती आणि चंकी पांडे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. २०१९ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.