मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांतून देशाच्या अनेक भागांतील कामगारांना तो मदत करत आहे. याच कारणामुळे शनिवारी अभिनेत्याच्या या कामाबद्दलचे अनेक मीम सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाले.
सोशल मीडियावरुन मदत मागणाऱ्या अनेकांना सोनू मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. तुमच्या बॅग पॅक करा किंवा तुमच्या आईला मिठी मारण्यासाठी तयार राहा, अशा प्रकारची उत्तरे देत तो गरजूंना मदत करत आहे. हाच आता मीम्सचा विषय बनला आहे. एका मीममध्ये अमित शाह आणि सोनू सूद यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यातील अमित शाहांच्या फोटोला होम मिनिस्टर तर सोनू सूदच्या फोटोला होम मिनिस्टर लाईट, असे कॅप्शन देण्यात आले आहे.
दुसऱ्या एका मीममध्ये एका बाजूला सर्व अॅव्हेंजर आहेत, तर दुसरीकडे सोनू सूद आहे. याला रिल लाईफ आणि रिअल लाईफ हिरो असे कॅप्शन देण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर सोनू सूदचे नाव आणि रिअल हिरो हा हॅश्टॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेकांनी ट्विट करत स्थलांतरित कामगारांसाठी सोनू सूद देव असल्याचे सांगत प्रत्येक हिरो कॅप घालत नसल्याचे म्हटले आहे. सोनू सूदच्या या कामासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.