मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांना नेहमीच भाईजानच्या लग्नाविषयी उत्सुकता असते. सलमान कोणासोबत आणि केव्हा लग्नगाठ बांधणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार सलमानने सरोगसीच्या माध्यमातून पालकत्व स्वीकारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. असे झाल्यास शाहरूख खान, करण जोहर, तुषार कपूर यांच्यापाठोपाठ सरोगसीच्या माध्यमातून पिता होणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सलमानचाही समावेश होईल. भाईजान अनेकदा आपल्या भाच्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असतो. त्यामुळे त्याला लहान मुलांचा किती लळा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आता सलमान स्वतः या वृत्ताला दुजोरा कधी देणार याकडेच त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान तो लवकरच 'भारत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ आणि दिशा पटानीदेखील झळकणार आहे.