'बाहुबली' अभिनेता प्रभासचा बहुप्रतीक्षित 'साहो' चित्रपट ३० ऑगस्टला रिलीज होतोय. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल ३५० कोटी रुपये खर्च झाल्याचे स्वतः प्रभासने 'द कपील शर्मा शो'मध्ये अलिकडेच सांगितले होते. गेली दोन वर्षे यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतोय. आता इतका अफाट पैसा खर्च झालाय पण तो वसूल होईल का हा खरा सवाल आहे. 'बाहुबली' चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकार होते. त्यामुळे झालेली प्रचंड कमाईचे श्रेय सर्वांकडे जात होते. यावेळी 'साहो'मध्ये मात्र, सर्व ओझे प्रभासच्या खांद्यावर आहे. त्यामुळे थोड्या दबावात प्रभास वावरतोय. परंतु पैसा वसूलीचा जबरदस्त प्लॅन तयार करण्यात आलाय.
'साहो' हा चित्रपट भारतात १०,००० स्क्रिन्सवर झळकणार आहे. आंध्र आणि तेलंगणा या दोन राज्यात प्रभासची प्रचंड लोकप्रियता आहे. या दोन राज्यात २ हजार स्क्रिन्सवर 'साहो' दिसेल. उत्तर भारतात 'बाहुबली' चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर प्रभासचे फॅन फॉलोअर्स इथेही वाढलेत. यावेळी 'साहो' ४५०० स्क्रिन्सवर उत्तर भारतात रिलीज होणार आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक इथूनही प्रभासच्या या चित्रपटाला यश मिळणार याची निर्मात्यांना खात्री आहे.
'साहो' चित्रपट तेलुगु, तामिळ आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. तिन्ही भाषेतून चित्रपटाला प्रतिसाद मिळेल यासाठी प्रमोशनचा जोरदार फंडा वापरण्यात येतोय. पहिल्याच दिवशी भारतीय मार्केटमध्ये १०० कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन होईल अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जाते.
'साहो' चित्रपटाचे संगीत, सॅटेलाईट राईट्स आणि इतर माध्यमातून ३०० कोटींची कमाई रिलीज अगोदरच झाली असल्याचे समजते. भारतीय चित्रपटांना सध्या चीनमध्ये चांगली मागणी आहे. दंगल, बाहुबली, बजरंगी भाईजान या चित्रपटांनी तुफान कमाई चीनमध्ये केली होती. 'बाहुबली'मुळे चीनमध्येही प्रभास लोकप्रिय आहे. या मार्केटवरही 'साहो'चा डोळा असेल हे निश्चित.
'साहो' चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितिन मुकेश, अरुण विजय, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि मुरली शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.