मुंबई - दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व, तिमिरातूनी तेजाकडे घेऊन जाणारा आनंदोत्सव. भारतात विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, यातील अनेक उत्सवाला भौगोलिक किंवा प्रांताच्या मर्यादा असतात, परंतु दिवाळी हा सण संपूर्ण देशभर सर्वच नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करतात. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते, यंदाही दिवाळीच्या आनंदाला तोटा नसला तरी कोरोना, लॉकडाऊन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साहाला मात्र नेहमीची झळाळी बघायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ने ‘आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणार्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, सुप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया देशमुख अशी तगडी मंडळी या मराठी शॉर्टफिल्मसाठी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत.
या विषयी शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर महेश लिमये म्हणाले, “सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाऊनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवूया, अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली, यातून ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मची निर्मिती झाली. या शॉर्टफिल्मची संकल्पना ऐकताक्षणी अभिनेता रितेश देशमुख आणि संगीतकार अजय-अतुल यांनी होकार दिला. बालन यांची संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धन याने त्याच्या लेखणीतून उत्तम उतरवली आहे. संगीतकार अजय – अतुल यांनी अतिशय कमी वेळेत पार्श्वसंगीताचा साज ‘आशेची रोषणाई’ला चढवला आहे तर रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी चार चाँद लावले आहेत.”
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
निर्माते पुनीत बालन म्हणाले, “गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही निर्मिती केलेल्या दोन्ही शॉर्टफिल्मला जगभरातील गणेशभक्तांची दाद मिळाली. देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी सर्व व्यवहार पूर्ववत झालेले नाहीत. आम्ही प्रशासनाच्या मदतीने हजारो लोकांपर्यंत विविध स्वरुपात मदत पोहोचवली आहे. अजूनही अनेक लोकांना मदतीची आवश्यकता आहे, अशा गरजू लोकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा हेतू आहे. ‘आशेची रोषणाई’ बघून नागरिक आपल्या जवळपासच्या गरजूंना छोटीशी मदत करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास वाटतो.”
निर्माते पुनित बालन यांची संकल्पना असलेली ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनित बालन स्टुडिओज’ची सामाजिक संदेश देणारी सलग तिसरी निर्मिती आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे व ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा व्हाईस ओव्हर लाभला आहे. ‘आशेची रोषणाई’चे क्रिएटिव्ह हेड विनोद सातव आहेत, तर कार्यकारी निर्माते म्हणून अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनित बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इन्स्टाग्राम पेजवर विनामूल्य उपलब्ध आहे.