मुंबई - बिहारमध्ये सुशांतचे वडिल के के सिंग यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तिच्यावर खोटे आरोप केले असल्याचे अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेने एक वेगळे वळण घेतले आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे दाखल केलेल्या तक्रारीत रिया चक्रवर्तीसह सहा जणांना सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार धरले आहे.
रिया चक्रवर्तीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून पाटणा येथील दाखल तक्रारीची चौकशी मुंबई येथे स्थलांतरीत करण्याची विनंती केली आहे. तिने न्यायालयाला सांगितले की, सुशांतच्या मृत्यूनंतर तिला सतत जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येत आहेत. मीडियामध्ये सतत येणाऱ्या बातम्यांमुळे यामध्ये वाढ झाल्याचे तिने म्हटलंय. तसेच सुशांतसोबत ती ८ जूनपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. सुशांत काही दिवसापासून नैराश्येमध्ये होता आणि तो उदास झाला होता, असा दावाही रियाने केला.
सुशांतने 14 जून रोजी सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी ही आत्महत्या नसून हत्या असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि मुंबई पोलिसांनी रियासह इतर बॉलीवूड कलाकारांना समन्स बजावले. या सर्वांचे जबाब वांद्रे पोलिसांनी नोंदवले आहेत.
हेही वाचा - रियाच्या याचिकेनंतर सुशांतच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केले 'कॅव्हिएट'
रियाने मुंबईतील सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूच्या आणि बलात्काराच्या धमक्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीचा तपास पाटणा येथून मुंबईत हस्तांतरित केल्यास ते न्याय्य आणि फायद्याचे ठरेल, असे रियाने या याचिकेत म्हटले आहे.
याप्रकरणी रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, त्यांच्या रियाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यात पाटण्यातील चौकशी मुंबईत स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मानेशिंदे यांनी याचिकेचा मजकूर शेअर करण्यास नकार दिला.
१४ जून रोजी सुशांतसिंहने आत्महत्या केली होती. त्या आधी सुशांत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या वडिलांनी रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर केल्याचा आरोप केला आहे.