मुंबई - जम्मू आणि काश्मीर येथे पंडितांवर आधारीत 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाला महाराष्ट्र सरकारने टॅक्स मुक्त करावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली. आघाडी सरकारने सवलत न दिल्यास राज्यातील हिंदू रस्त्यावर उतरतील, असा इशारा कदम यांनी दिला. विधानभवनात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
जम्मू - काश्मिर मध्ये काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले होते. या घटनेवर आधारीत द काश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चांगली दाद मिळत आहे. परंतु कॉंग्रेसकडून टॅक्स मुक्त करण्यास विरोध होतो आहे. एकीकडे निवडणुकीसाठी मंदिरे, धर्म स्थळात जाणे, जाणवे घालमे आणि दुसरीकडे विरोध करण्याचा प्रकार निषेर्धात आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा टॅक्स मुक्त करावा, अशी मागणी असल्याचे कदम म्हणाले.
हिंदू रस्त्यावर उतरतील
महाराष्ट्रातील कॉंग्रेसकडून देखील टॅक्स मुक्तीस विरोध आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे सरकार टॅक्स मुक्त करण्याची शक्यता कमी आहे. आघाडी सरकारने टॅक्स मुक्त न केल्यास राज्यातील हिंदू रस्त्यावर उतरतील, असा इशारा कदम यांनी दिला.
बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेनेने सोडले
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काश्मिरी पंडितांच्या पाठिशी ठाम उभे राहिले होते. बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेनेने कधीच सोडले आहे. निवडणुका आल्या की शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करते. आताची स्थिती वेगळी आहे. निवडणुका येतील, जातील. शिवसेनेने हिंदुत्वांच्या मागणीकडे गांभिर्याने पहावे. सामनामध्ये एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार लेख छापले जात होते. आता त्यांचे तोंड कोणी शिवले आहे का? आता का बोलत नाहीत?, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. शिवसेनेला हिंदुत्वाची खरचं चिंता असेल, तर द काश्मिर फाईल्स टॅक्स मुक्त करतील, असेही राम कदम म्हणाले.
हेही वाचा - बंगाली अभिनेत्री रूपा दत्ताला 'खिसा' मारल्याप्रकरणी अटक