मुंबई - ‘शार्दुल’ आणि ‘सुमी’ला नेहमीच चित्रपटातून एकत्र काम करण्याची इच्छा होती. आता तुम्ही विचाराल हे ‘शार्दुल’ आणि ‘सुमी’ कोण? तर ही नाव आहेत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या व्यक्तिरेखांची त्यांचा आगामी ‘बधाई दो’ चित्रपटातली. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर हे दोन्ही कलाकार आशयघन चित्रपटातून कामं करण्यास प्राधान्य देतात. परंतु इतक्या वर्षांत या गुणी कलाकारांना एकत्र चित्रपट काही करता आला नाही, कारणं काही का असेना. परंतु आता राजकुमार व भूमी ‘बधाई दो’ च्या मेकर्सवर खुश आहेत की, त्यांनी दोघांचीही चित्रपटात एकत्र काम करण्याची इच्छा पूर्ण केलीय.
जंगली पिक्चर्सचा चित्रपट 'बधाई दो' २०१८ साली प्रदर्शित झालेल्या आणि राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवलेल्या 'बधाई हो'चा ‘सिक्वेल’ आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत असून ते गेल्या महिन्यापासून मसूरी आणि देहरादूनमध्ये शूटिंग करत आहेत. हा चित्रपट, दोन अर्थपूर्ण चित्रपटांतून काम करणाऱ्या, राजकुमार आणि भूमी यांचा पहिला सहयोग आहे आणि ते दोघेही म्हणतात की ,'बधाई दो' हा ते शोधात होते त्यातीलच एक चित्रपट आहे. नुसतं एकत्र यायचं म्हणून एकत्र येण्यात काही अर्थ नव्हता. पण या अर्थपूर्ण चित्रपटात दोघांच्याही भूमिकांना न्याय मिळेल अशी संहिता आहे.
राजकुमार राव म्हणाला, “भूमीबरोबर काम करायला झकास वाटते आहे. ती खूपच हुशार आणि कुशाग्र बुद्धीची आहे. मी नेहमीच तिच्या भूमिका बघत आलोय एक अभिनेत्री म्हणून तिच्यात झालेली वाढ लक्षणीय आहे. मी तिच्याबरोबर काम करण्याची अपेक्षा करत होतो परंतु चांगले स्क्रिप्ट मिळत नव्हते. आता 'बधाई दो' आमच्या पदरात पडला असून आम्ही दोघांनी ही संधी सोडायची नाही हे ठरविले.”
भूमी पेडणेकर व्यक्त झाली, “राज बरोबर कामं करणे हा माझ्यासाठी आविष्करणी अनुभव आहे. मला वाटलं होतं की तो खूप गंभीर आणि अंतर्मुख करणारा असेल, परंतु तो तसा अजिबातच नाही, किमान या चित्रपटात नाही. तो काम करण्यासाठी एक धमाकेदार आणि त्याचबरोबर मजेदार अभिनेता आहे. आम्ही दोघे एकत्र काम करण्यासाठी योग्य चित्रपटाच्या शोधात होतो आणि 'बधाई दो' सारख्या तगड्या स्क्रिप्टसाठी एकत्र येणे म्हणजे आमच्या सबुरीचे फळ आहे.”
दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी या नव्या जोडीचे तोंडभरून कौतुक करताना सांगतात की, "दोघेही खूप मेहनती आहेत. ते नेहमीच त्यांच्या कलाकुशलतेची जोपासना करून त्याहीपुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यानुसार सुधारणा करतात. काही वेळा मी जरी शॉट ‘ओक’ केला असेल तरी ते म्हणतात, 'चला जरा अजून एक प्रयत्न करूया.' त्यांच्यासोबत शूटिंग करण्याचा हाच एक उत्तम भाग आहे. हे दोघेही मलासुद्धा अत्युत्तम काम करण्यासाठी उद्युक्त करतात.”
राजकुमार चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला, "बधाई दो ची पटकथा अप्रतिम आहे. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आम्हाला खूप मजा येत आहे, कारण ती उत्तम विनोदांनी भरली आहे आणि उत्तम पात्रं लिहिली गेली आहेत. मी शार्दुल ठाकूर नावाचा पोलिस ऑफिसर साकारत आहे. माझी ही पहिलीच ‘पोलीस’ भूमिका आणि ती कशी वठतेय याबाबत मी उत्सुक आहे. भूमी पेडणेकर या सिनेमात ‘सुमी’ नावाच्या पीटी शिक्षकेची भूमिका साकारतेय.”
अक्षत घडियाली आणि सुमन अधिकारी यांनी लिहिलेल्या ‘बधाई दो’ चे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी करीत असून याची निर्मिती जंगली पिक्चर्सची आहे.
हेही वाचा - क्रिकेटची पार्श्वभूमी ल्यालेल्या ‘फ्री हिट दणका' मधून दिसणार ‘फॅन्ड्री’फेम सोमनाथ अवघडे!