मुंबई - आशयघन विषयांना नर्मविनोदी शालीत लपेटून मनोरंजनाची उब देणारे दिग्दर्शक म्हणजे राजकुमार हिरानी. ‘मुन्नाभाई एम बी बी एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ ‘पी के’, ‘संजू’ सारखे एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या राजकुमार हिरानींच्या पुढच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पहिली जाते. त्यांच्या ‘मुन्नाभाई एम बी बी एस’ मधील संजय दत्तची चित्रपटातील त्याच्या आईने शिकवलेली ‘जादूकी झप्पी’ खूपच प्रसिद्ध आहे. कोणी मानसिक रूपाने खचला असेल वा विवंचनेत असेल तर त्याला ही ‘जादूकी झप्पी’ दिली की त्याचा त्रास हमखास कमी होतो अशी त्यातली शिकवण होती. वास्तविक आयुष्यातही अनेकजण हा शब्दप्रयोग वापरू लागले व कृतीतही आणू लागले. परंतु सध्याच्या कोरोना काळात ‘जादूकी झप्पी’ मुळे तुरुंगवास भोगावा लागेल असे राजकुमार हिरानी हसतहसत म्हणतात.
नुकतेच राजकुमार हिरानी यांनी एका मॅनेजमेंट स्टडीज वेब-सेमिनारमध्ये भाग घेतला होता व विध्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ‘कोरोना महामारीमुळे आलेल्या कठीण समयी सिनेसृष्टीला काळाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. चित्रपटांच्या कथेमध्ये ताकत भरायला हवी तसेच चित्रपटगृहांनी नावीन्यतेची कास धरली पाहिजे’ असे हिरानी म्हणाले. त्यांनी सांगितले की अख्खा लॉकडाऊन त्यांनी दोन टी-शर्ट्स आणि एका शॉर्ट्स वर काढला. परंतु त्यांनी आपले काम सुरूच ठेवले होते. ते घरचं जेवण आवडीने जेवत परंतु त्यांनी आपल्या टीममधील आणि आजूबाजूच्या लोकांची आवर्जून लागेल ती मदत केली. त्यांनी शक्य असेल तेथे इतरांनाही मदत केली. गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
राजकुमार हिरानी नेहमीच वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखांना पडद्यावर दर्शवितात व त्यांना कोविड काळातील ‘जादूकी झप्पी’ बद्दल विचारल्यावर ते मिश्कीलपणे बोलले, ‘सध्याच्या कोरोना संक्रमण काळात हात मिळवायला पण लोक घाबरत आहेत अशावेळी ‘जादूकी झप्पी’ दिली तर थेट तुरुंगाची हवा खावी लागेल.’
हेही वाचा -जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांच्यात काय साम्य आहे?