मुंबई - खळबळजनक पॉर्न फिल्म्स रॅकेट प्रकरणातील प्रमुख आरोपी - उद्योगपती राज कुंद्रा याने त्याचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहेत. दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्सवर राजचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स होते.
सप्टेंबरमध्ये, मुंबई सत्र न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्याचा सहआरोपी रायन थॉर्प यांना जामीन मंजूर केला. दोघांनाही जुलैमध्ये पकडण्यात आले होते. तेव्हापासून कुंद्रा याने सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावलेली नाही. त्याची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या नेहमीच्या कामावर परतली आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र तिचा पती राज कुंद्राने त्याचे ट्विटर आणि इंस्टाग्राम खाते कायमचे हटवल्यामुळे या माध्यमाच्या जगापासून तो आता दूर गेला आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्राने त्याच्याकडून मानसिक छळासाठी 75 कोटी रुपयांची मागणी केल्याने राज देखील कायदेशीर अडचणीमध्ये आहे. दरम्यान शिल्पा शेट्टीने आरोप केला आहे की या तिला व नवऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमकी दिली जात आहे. शर्लिनचे कायदेशीर पाऊल हे शिल्पा आणि राज यांनी तिच्यावर दाखल केलेल्या 50 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्याची प्रतिक्रिया आहे. याआधी 14 ऑक्टोबरला शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात फसवणूक केल्याची आणि मानसिक छळ केल्या बद्दलची तक्रार दाखल केली होती.
राज कुंद्रा याला पोलिसांनी 19 जुलै रोजी अश्लील चित्रपटांच्या कथित निर्मितीच्या आरोपाखाली अन्य 11 जणांसह अटक केली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई कोर्टाने 20 सप्टेंबर रोजी त्याला 50 हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर झाला होता.
हेही वाचा - HBD SRK : मन्नत बंगल्याबाहेर फॅन्सची गर्दी, शाहरुख मात्र एकांतवासात