सध्या देशातील राजकीय वातावरणात बऱ्याच गोष्टी घडताना दिसताहेत. जेव्हापासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सल्लागारपदी नियुक्त केले आणि प्रशांत यांनी त्यांना एकहाती निवडणूक जिंकण्यास मदत केली तेव्हापासून प्रशांत किशोर यांची पत वधारली आहे. त्यातच त्यांनी कालच राजकीय नीतीतील चाणक्य समजले जाणारे राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत जवळपास साडेतीन तास चर्चा केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
शरद पवारांच्या भेटीनंतर त्याच संध्याकाळी किशोर यांनी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘मन्नत’ वर हजेरी लावली तेव्हा तर चर्चांना उधाण आले. शाहरुखची पॉलिटिक्स मध्ये एन्ट्री होणार का? किंवा प्रशांत यांच्यावरील जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती एसआरके ची ‘रेड चिलीज’ करत आहे का? असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकजण विचारले जाऊ लागले. रेड चिलीजच्या प्रवक्त्याने या सर्व अफवा आहेत म्हणत कुठल्याही न्यूजला दुजोरा दिला नाही. शाहरुख आणि प्रशांत यांच्यात मैत्री असून ते अधून मधून भेटत असतात तशीच ही भेट होती असे कळविण्यात आले.
प्रशांत किशोरने अभिनेता शाहरुख खानलाही त्यांच्या घरी “मन्नत” येथे भेट दिली त्यावर किशोर यांच्या निकटवर्तीयांनी या बैठकीचे सभ्यतेची भेट म्हणून वर्णन केले आणि सांगितले की ते दोघेही तीन वर्षांपासून मित्र आहेत आणि नियमितपणे भेटत असतात. शाहरुख खानची प्रशांत किशोरशी ओळख ममता बॅनर्जी यांनी करुनदिली होती. शाहरुख खानच्या राजकीय प्रवेशाबद्दल अफवांना सूत्रांनी बेकार म्हणून संबोधिले आणि असेही सांगितले की शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस किशोरवर वेब-सिरीज वा चित्रपट बनवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अधिकृत सूत्रांनुसार, प्रशांत किशोर यांच्या या भेटी ‘थँक्सगिव्हिंग ट्रिप’ आहे. नजीकच्या काळात ज्यांनी ज्यांनी त्यांच्या कामात मदत केली त्यांना ते भेटणार आहेत.
अनेकांना अनुभवातून माहीतच असेल की राजकारणात काय किंवा फिल्म इंडस्ट्रीत ज्या गोष्टी अफवा म्हणून सांगितल्या गेल्या आहेत, त्या नंतर खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शाहरुख खान प्रशांत किशोर यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता वा निर्माता म्हणून समोर आला तर नवल वाटायला नको.
हेही वाचा - मंदिरात चोरी केल्यावर 'त्याने' घेतले देवीचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल