मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने मंगळवारी इन्स्टाग्रामवरून लोकांना कोविड-19 या महामारीदरम्यान जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. देशभरात कोरोनामुळे पसरलेल्या साथीचे प्रमाण वाढत असतानाही लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. यानंतर लोकांची जबाबदारी वाढली असल्याचे परिणीतीने म्हटले आहे.
"आवश्यक कामांसाठी किंवा पर्यायच नसल्यामुळे बरेच जण आता घराबाहेर पडले आहेत. ज्यांच्याकडे पर्याय नाही त्यांना बाहेर पडावेच लागेल. मात्र, तुम्हाला बाहेर पडणे किंवा घरी थांबणे यापैकी एकाची निवड करणे शक्य असेल, तर घरीच रहा. त्या बाहेर पडलेल्या लोकांसाठी आणि तुमच्या स्वतःसाठीही. जर तुम्हाला बाहेर जावेच लागणार असेल तर, कृपया जबाबदारीनेच घराबाहेर पडा," असे परिणीती इंस्टाग्रामवर लिहिले आहे.
"जर तुम्ही लोकांना भेटलात, तर जबाबदारीने भेटा, वागा. अगदी जरी तुम्ही एकटे राहत असलात तरीही इतर लोक एकटे रहात नाहीत किंवा तसे राहणे त्यांना शक्य नाही. स्वतःलाच विचारा की, ही दुसरी व्यक्ती आधीच कोणाला भेटली असेल किंवा नंतर कोणाला भेटेल. त्यांच्या घरी वडिलधारे लोक असू शकतात. घरात इतर लोकही असून शकतात. सर्वांच्याच घरी असे लोक आहेत, असे समजूनच प्रत्येकाशी त्यानुसार वागा," असे तिने पुढे म्हटले आहे.
परिणीती चोप्राचे ‘संदीप और पिंकी फरार,’ ‘दि बायोपिक सायना’ हे बॉलीवूडचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच, ‘दि गर्ल ऑन दि ट्रेन’ या हॉलिवूडपटाच्या हिंदी रिमेकमध्येही ती दिसणार आहे.