मुंबई- संगीतमार्तंड पंडित जसराज यांचे पार्थिव आज दुपारी मुंबईत आणण्यात आले.आज त्यांचे पार्थिव घरीच ठेवण्यात येणार असून उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही नातेवाईक, आप्तस्वकीय आणि शिष्यगण अजून मुंबईत पोहोचले नसल्याने उद्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंडित जसराज 17 ऑगस्टला अमेरिकेतील न्यू जर्सी येथे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. आज त्यांचे पार्थिव कर्मभूमी असलेल्या मुंबईत आणण्यात आले. आज दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर लगेचच ते खास रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या वर्सोवा येथील घरी नेण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी मधुरा जसराज, मुलगी दुर्गा जसराज आणि मुलगा शांरंग देव हे देखील त्यांच्यासोबत होते.
गुरुवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पंडित जसराज यांचे पार्थिव राहत्या इमारतीच्या लॉबीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. 5 वाजता ही अंत्ययात्रा मुंबईतील जुहूमधील पवनहंस येथील हिंदू स्मशानभूमीत पोहचेल, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात 21 बंदुकांची सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल.जसराज यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतातील एक सूर्य कायमचा अस्ताला गेला आहे, अशी भावना संगीत क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण या तिन्ही पद्म पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले शास्त्रीय गायक होते.