मुंबई - अजय, तब्बू आणि रकुल प्रीत यांच्या भूमिका असलेला 'दे दे प्यार दे' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशात चित्रपटातील नवनवीन गाणी प्रदर्शित केली जात आहेत. आतापर्यंतच्या गाण्यांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'दिल रोयी जाये' असं या गाण्याचं शीर्षक आहे. हे एक इमोशनल गाणं असून ते अजय आणि रकुलवर चित्रीत केलं गेलं आहे. नात्यात आलेल्या दुराव्यामुळे दोघांच्या मनाची चाललेली घालमेल या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्याला 'तेरा यार हूँ मैं' गाण्याच्या टीमने आवाज दिला आहे.
अरिजीत सिंग, रोचक कोहली आणि कुमार यांच्या आवाजाने या गाण्याला अधिक खास बनवलं आहे. आता हे गाणं प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान अजय या चित्रपटाशिवाय लवकरच 'भूज: द प्राईड ऑफ इंडिया'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.