मुंबई - सामाजिक विषयांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अक्षय कुमार लवकरच आणखी एका सत्य घटनेवर आधारित 'मिशन मंगल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटात अक्षयशिवाय पाच अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटावर अक्षयने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
हा चित्रपट केवळ भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित नसून ही कथा या मोहिमेत महत्त्वाचं योगदान असणाऱ्या पाच शास्त्रज्ञ महिलांची असल्याचे अक्षयने म्हटलं आहे. या महिलांची भूमिका सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, विद्या बालन, किर्ती कुल्हारी आणि निथ्या मेनन या अभिनेत्री साकारत आहेत.
दरम्यान चित्रपटातून मंगळ मोहिमेच्या यशात वाटा असणाऱ्या १७ शास्त्रज्ञांची कथा दाखवण्यात येणार आहे. मात्र, यातील महिलांची ताकद अक्षयला दाखवून द्यायची आहे. महिला या आपलं घर सांभाळूनही या सगळ्या गोष्टी किती उत्तम पद्धतीने करत असतात, हे मला या चित्रपटातून दाखवयाचं असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून सिनेमा येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.