मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मोठे तणावाचे वातावरण आहे. यानंतर बॉलिवूडमधील डिप्रेशनमध्ये गेलेल्या अनेक कलाकारांनी आपले अनुभव सांगितले आहेत. अलिकडे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी यांनीही आपल्या मनात आत्महत्येचे विचार येऊन गेल्याचे सांगितले आहे.
मनोज बाजपेयी म्हणाले, "मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. बिहारच्या गावामध्ये पाच भावा बहिणींसोबत लहानाचा मोठा झालो. आम्ही सामान्य आयुष्य जगत होतो. जेव्हाही शहरात जायचो तेव्हा थिएटरमध्ये जायचो. मी अमिताभ बच्चन यांचा फॅन होतो आणि त्यांच्यासारखे बनावे असे वाटायचे. ९ वर्षाचा असतानाचा अॅक्टिंग करायचे आहे हे मला माहिती होते. १७ वर्षाचा झालो तेव्हा दिल्ली युनिव्हर्सिटीत दाखल झालो. मी नाटकात काम करायला सुरू केले होते, मात्र याबद्दल घरी काहीच माहिती नव्हते. मी वडिलांना एक पत्र लिहिले. ते रागावले नहीत आणि त्यांनी मला २०० रुपये पाठवले."
मनोज पुढे म्हणाले, "मी बाहेरचा होतो आणि नव्या वातावरणात अॅडजस्ट व्हायचा प्रयत्न करीत होतो. मी इंग्रजी शिकलो. त्यानंतर मी एनएसडीमध्ये अप्लाय केला. मात्र तीन वेळा रिजेक्ट झालो. मी आत्महत्या करण्याच्या जवळ होतो. माझे मित्र माझ्यासोबतच झोपायचे, मला एकटे सोडायचे नाहीत. त्याच वर्षी मी एका चहाच्या दुकानावर उभा असताना तिग्मांशु धुलिया खटारा स्कूटरवरुन मला शोधत आला. शेखर कपूर मला बँडेट क्वीनसाठी कास्ट करणार होते. त्यावेळी मला वाटले की मुंबईला जाण्यासाठी मी तयार आहे."
मनोज यांनी पुढे सांगितले, "सुरुवातीला सगळेच अवघड होते. पाच मित्रांनी आम्ही चाळ भाड्याने घेतली आणि काम शोधायला लागलो. परंतु रोल भेटला नाही. एकदा असिस्टंट डायरेक्टरने माझा फोटो फाडून टाकला. इतकेच नाही तर माझ्या पहिल्या शॉटनंतर मला गेट आऊट बोलण्यात आले. माझ्याकडे भाड्याचे पैसेही नव्हते आणि वडा पाव महाग वाटत होता."
हेही वाचा -सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; संजय लीला भन्साळींची होणार चौकशी
चार वर्षाच्या स्ट्रगल बद्दल बोलताना मनोज पुढे म्हणाले, "चेहरा हिरोसाठी फिट होत नव्हता. त्यामुळे मोठ्या पडद्यावर जागा बनवू शकणार नाही असे मला लोक म्हणायचे. चार वर्षाच्या स्ट्रगलनंतर मला महेश भट्ट यांच्या टीव्ही सिरीयलमध्ये रोल मिळाला. एका एपिसोडसाठी मला १५०० रुपये मिळायचे. यानंतर माझे काम लक्षात ठेवले गेले आणि मला पहिला सिनेमा मिळाला. त्यानंतर 'सत्या'मुळे मला मोठा ब्रेक मिळाला. मग पुरस्कार मिळाले. मी पहिले घर खरेदी केले आणि इथे टिकून राहू असे वाटत होते. ६७ चित्रपटानंतर मी आज इथे आहे."
मनोज बाजपेयीने आपले बॉलिवूडमधील स्थान स्वतः निर्माण केले. बॉलिवूडच्या सत्या, अलीगढ़, राजनीति, सत्याग्रह, गैंग्स ऑफ वासेपुर यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. मनोज बाजपेयी गेल्या वर्षी रिलीज झालेल्या सोनचिडिया या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतसोबत शेवटचे झळकले होते.