मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार लपवालपवी करत असून, त्यांना कंगनाची का भीती वाटतेय, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. संजय राऊत आणि कंगना रनौत यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर कदम बोलत होते.
"सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना रनौतला धमकावण्याचे दुःसाहस केलंय. की कंगनानं मुंबईत येऊ नये..का कंगनानं मुंबईत येऊ नये? कंगनाच्या मुंबईत येण्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारला इतकी भीती वाटण्याचे कारण काय?", असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.
कंगनाची भीती महाराष्ट्र सरकारला वाटतंय असेही ते म्हणाले. राम कदम म्हणतात, "वास्तविक मोठ्या साहसाने ते कोण नेते, अभिनेते, ड्रग माफिया, बॉलिवूड सगळ्यांची नावांची ती पर्दापाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचं महाराष्ट्र सरकारनं स्वागत करायचं सोडून तिला धमकी देताय. कंगनाच्या मुखातून ती नावं निघू नयेत आणि ती नावं निघालीत तर महाराष्ट्र सरकार अडचणीत येईल, ही खरी महाराष्ट्र सरकारची भीती आहे. म्हणून कंगनाला धमकावणं, हे महाराष्ट्र सरकारच्या भितीपोटी झालेलं कृत्य आहे."
राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारवर अनेक ताशेरे ओढले आहेत. राम कदम पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या सरकारनं एक गोष्ट लक्षात ठेवावी. कंगना झाशीची राणी आहे, ती एकटी नाही. तिच्यासोबत अखंड देश उभा आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने महाराष्ट्र सकारची लपवालपवी अडीच महिने देश पाहतो आहे, ही लपवालपवी सरकार का करत आहे, याची उत्तरं द्यावी लागतील."
काय आहे वाद?
त्यानंतर संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिले होते की, मुंबईमध्ये राहत असूनही कंगनाचे मुंबई पोलिसांवर शंका घेणे निंदास्पद आहे. कंगनाने मुंबईत परत नाही आले तरी चालेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्यासाठी खुली धमकीच दिली असल्याचे कंगनाने म्हटले आहे. मुंबईत पीओकेसारखे वातावरण निर्माण होत असल्याची भावना येत आहे, असे तिने ट्विट करून म्हटले आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगनाने शिवसेनेवर निशाणा साधला होता. या प्रकरणात शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्यानंतर चौकशी करून सत्य समोर यावे, अशी मागणी तिने केली होती. या प्रकरणाला ड्रग्जचे वळण मिळाल्यावर काल कंगनाने रणवीर सिंग, रणबीर कपूर, आयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी अँटी ड्रग्ज चाचणीला सामोरे जायला हवे, असं ट्विट करून ते पीएमोला टॅग देखील केले होते. काल दिवसभर कंगणाने केलेल्या या आरोपांबाबत माध्यम आणि सोशल मीडियामध्ये एकच चर्चा सुरू झाली होती.