मुंबई - कॅटरिना कैफला कोरोनाने ग्रासले होते तेव्हा तिचे फॅन्स खूप हळहळले, मात्र, कॅटरिनाने कोरोनावर मात केल्यावर हेच फॅन्स प्रचंड खुश झाले. परंतु त्यांना कल्पना नसावी की कोरोना तुमच्या शरीरावर कशाप्रकारे आघात करतो आणि कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी नंतरची पण खूप पथ्ये आहेत. एकतर कोरोनाग्रस्त व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे शरीरात ताकत येण्यासाठी बऱ्यापैकी वेळ लागतो. त्यामुळे जर का तुम्ही व्यायामभोक्ते असाल तर जरा सांभाळूनच, असा सल्ला अभिनेत्री कॅटरिना कैफने दिला आहे.
कॅटरिनाचा चाहत्यांना व्यायामाबद्दल सल्ला
यावर्षी एप्रिल ७ रोजी कॅटरिना कैफला कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले होते. तिने विलगीकरणात राहून नंतर १७ एप्रिल रोजी केलेल्या चाचणीमध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी कॅटरिनाने एक पोस्ट-रिकव्हरीचा सल्ला आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये व्यायाम करणे किती अवघड आहे. याबद्दल तिने आपला अनुभव शेअर केला. कोरोनावर मात केल्यावर आपल्या चाहत्यांसाठी व्यायामासंदर्भात महत्त्वाचा सल्लादेखील तिने दिला आहे.
'कोविडनंतर ताबडतोब जास्त प्रमाणात शारीरिक कष्ट करू नयेत'
‘कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर काही दिवस मी विश्रांती घेतली. परंतु आता व्यायामाकडे वळले असले तरी मला वर्कआउट करणे कठीण जाते आहे’, असे कॅटरिना म्हणाली. तिने पुढे लिहिले की, "कोविड पश्चात मला व्यायामाकडे परत जाण्याच्या बाबतीत धीर धरावा लागला. थोडे सबुरीने घेणे गरजेचे आहे हे अजूनही जाणवत आहे. आपल्या शरीराचे ऐकावे लागेल आणि त्याच्या कलाने घ्यावे लागेल. शरीर कधी खूप साथ देते तर कधी लगेच थकवा आणते. आपल्या शरीराच्या उपचार प्रक्रियेवर विश्वास ठेवणे महत्वाचे असून आणि स्वत:ला वेळ देत व्यायाम करायला हवा, स्टेप-बाय-स्टेप.” कोविडमधून बाहेर आलेल्यांनी ताबडतोब जास्त प्रमाणात शारीरिक कष्ट करू नयेत, असा सल्लाही तिने दिला आहे.
कॅटरिनाचा 'सूर्यवंशी', 'फोन भूत' सिनेमा प्रदर्शनासाठी तयार
वर्क फ्रंटवर कॅटरिना कैफ लवकरच सुपरस्टार सलमान खानसोबत 'टायगर ३’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यानंतर ती श्रीराम राघवनच्या पुढच्या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. तिच्या प्रमुख भूमिका असलेले ‘सूर्यवंशी’ (गेल्या वर्षीपासूनच) आणि ‘फोन भूत’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.
हेही वाचा - प्रेम प्रकरण चव्हाट्यावर आणल्यामुळे हर्षवर्धनवर कॅटरिना कैफ नाराज