मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत राहते. तिचा आगामी 'पंगा' चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती कबड्डी खेळाडूची भूमिका साकारत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने विराट कोहलीबद्दल एक वक्तव्य केले आहे. विराट हा भारतीय क्रिकेट संघाचा 'पंगा किंग' आहे, असे ती म्हणाली.
हेही वाचा - न्यूझीलंड मालिकेतून इशांत शर्मा 'आऊट'!
'मी पंगा क्विन आहे. तर, भारतीय क्रिकेट संघाचा 'पंगा किंग' हा विराट कोहली आहे. तो खूप निडर आहे. त्याच्यासमोर आलेल्या आव्हानांचा तो धैर्याने सामना करतो. यावेळी आम्ही दोघंही सोबतच पंगा घेणार आहोत. मी सिनेमागृहात पंगा घेणार आहे. तर विराट भारतीय क्रिकेट संघासोबत न्यूझीलंड संघाविरुद्ध मैदानात पंगा घेणार आहे', असे कंगना 'पंगा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान म्हणाली आहे.
कंगनाने स्टार स्पोर्ट्सच्या 'नेरोलॅक क्रिकेट लाईव्ह' या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी तिने आपले मत व्यक्त केले. अश्विनी अय्यर तिवारीने 'पंगा' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नीना गुप्ता, रिचा चढ्ढा आणि जस्सी गील हे कंगनासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
कंगनाने काही दिवसांपूर्वीच स्वत:च्या निर्मिती गृहाचे उद्घाटन केले. 'मणिकर्णिका फिल्म्स' असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. कंगनाची बहीण रंगोलीने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. कंगना आता निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणूनही काम पाहणार आहे.