कंगना रानौतचे नाव गेले वर्षभरापासून सतत चर्चेत आहे. आताही तिचा आगामी चित्रपट ‘थलायवी’, जो २३ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. “‘थलायवी’ प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये खेचून आणेल” असे भाकीत कंगनाने केले होते व ट्रेलर बघून ते सार्थही वाटत होते. परंतु सध्या महाराष्ट्र कोरोना संकटातून जात असल्यामुळे चित्रपटगृहे पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहेत. कोणताही चित्रपट महिनाभर तरी रिलीज होणार नाहीये. रोहित शेट्टी दिग्दर्शित-निर्मित, अक्षय कुमार, कतरीना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला व रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्या पाहुण्या भूमिका असलेला ‘सूर्यवंशी’ ला सुद्धा आपले ३० एप्रिलचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले आहे. महाराष्ट्रातील कोरोना-परिस्थिती भीषण असून सर्व सिनेनिर्मात्यांनी महाराष्ट्र शासनाला आपला पाठिंबा जाहीर करीत सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
दक्षिण भारतात कोरोना परिस्थिती इतकी गंभीर नाहीये म्हणून ‘हाथी मेरे साथी’, जो सुद्धा हिंदी, तामिळ, तेलगू मध्ये चित्रित झालेला आहे, चित्रपटाच्या निर्मात्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमुळे हिंदी आवृत्ती चे प्रदर्शन पुढे ढकलले व तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज केला. परंतु ए एल विजय दिग्दर्शित आणि कंगना रानौत अभिनित ‘थलायवी’ हिंदी भाषेबरोबरच तेलगू आणि तामिळ भाषेतही बनविला गेला असून निर्मात्यांना तो एकाचवेळी सर्व भाषांमध्ये प्रदर्शित करावयाचा आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक परिपत्रक काढून ‘थलायवी’ चे प्रदर्शन पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले.
परिपत्रकाचा स्वैर अनुवाद....
‘थलायवी’ च्या ट्रेलर ला तुम्ही दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि चित्रपटाविषयी दर्शविलेले प्रेम यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही हा चित्रपट बनविण्यासाठी स्वार्थत्याग बाजूला सारत अतीव मेहनत घेतलीय आणि या आव्हानात्मक काळात आमचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी दिलेल्या सहकाराबद्दल आभारी आहोत. ‘थलायवी’ अनेक भाषांमध्ये बनविलेला चित्रपट असून तो सर्वच भाषांमध्ये एकाचवेळी प्रदर्शित व्हावा अशी आमची इच्छा आहे.
परंतु सध्या पुन्हा झालेला कोव्हीड-१९ चा उद्रेक आणि झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता ‘थलायवी’, जो येत्या २३ एप्रिल ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, चे प्रदर्शन जड अंतःकरणाने पुढे ढकलावे लागत आहे. आम्ही राज्य शासनाला संपूर्ण सहकार्य करण्यासाठी बांधील आहोत म्हणूनच रिलीज डेट पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘थलायवी’ चे प्रदर्शन भलेही पुढे ढकलले गेले असले तरी आम्हाला खात्री आहे की या चित्रपटाला तुमच्याकडून नेहमीच भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळतील. प्रेक्षकांच्या स्वास्थ्यापोटी ‘थलायवी’ चे प्रदर्शन पुढे नेले आहे म्हणूनच तुम्ही काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.
असे निवेदन विष्णू वर्धन इंदुरी, शैलेश आर सिंग आणि झी स्टुडियोजच्या वतीने प्रसिध्द करण्यात आले आहे.