मुंबई - संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित 'कबीर सिंग' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिद कपूरनं प्रितीच्या म्हणजेच कियाराच्या प्रेमात बुडालेल्या आणि नशेच्या आहारी गेलेल्या कबीर नावाच्या तरूणाची भूमिका साकारली आहे. कबीर आणि प्रितीच्या या लव्हस्टोरीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. चित्रपटानं आतापर्यंत १०४.९० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं २०.२१ कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा शाहिद कपूरचा पहिलाच चित्रपट होता. आता हा चित्रपट आणखी कोणते नवे रेकॉर्ड बनवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तर २०१९ मधील चित्रपटांच्या यादीत सलमानच्या 'भारत'नंतर कमी दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'कबीर सिंग'ने दुसरा क्रमांक पटकवला आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील ही कमाई पाहता 'अर्जून रेड्डी'चा हिंदी रिमेक असणारा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, असं म्हणणं वावग ठरणार नाही.