मुंबई - राजकुमार राव आणि कंगना रनौत यांची जोडी 'क्वीन' चित्रपटानंतर 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि विश्लेषकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच आता सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे.
चित्रपट तज्ञांच्या मते, या सिनेमाने पहिल्या दिवशी ६ ते ८ कोटींचा गल्ला जमावला आहे. या सिनेमाचं बजेट ३५ कोटी आहे. त्यामुळे, बजेट पाहता पहिल्या दिवशीची ही कमाई चित्रपटासाठी चांगली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदाही कलेक्शनला निश्चितच होणार असल्याने पुढील दोन दिवसात या आकड्यात आणखी वाढ होईल, असं म्हणणंही वावगं ठरणार नाही.
दरम्यान, हा चित्रपट मनोरंजनाचा तडका आणि मर्डर मिस्ट्रीचा थरार आहे. सिनेमात कंगना आणि राजकुमारशिवाय जिम्मी शेरगिल, अमृता पुरी, हुसेन दलाल, सतीश कौशिक, ब्रिजेंद्र काला आणि अमयरा दस्तूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रकाश कोवेलामुडी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.